पत्नीस जाळून मारणाºया पतीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:15 PM2017-08-22T23:15:09+5:302017-08-22T23:17:35+5:30
नाशिक : मद्याच्या नशेत पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून मारणारा प्रसाद सुधाकर कुलकर्णी (रा. पौर्णिमा अपार्टमेंट, चेतनानगर) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश सूचित्रा एस़ घोडके यांनी मंगळवारी (दि़२२) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील अॅड. विद्या जाधव यांनी या खटल्यात १३ साक्षीदार तपासून न्यायालयापुढे सबळ पुरावे सादर केले़
इंदिरानगर परिसरातील चेतनानगरमध्ये प्रसाद कुलकर्णी हा पत्नी कीर्तीसह राहत होता़ प्रसाद हा मद्याच्या आहारी गेल्याने त्यांच्यात सतत वाद होत होते़ १२ मे २०११ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मद्याच्या नशेत प्रसादने पत्नी कीर्तीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले़ यामध्ये ९५ टक्के भाजलेल्या कीर्ती कुलकर्णी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़
या खटल्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक एस़ डी़ सानप यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते़ न्यायालयात सरकारी वकील अॅड़ विद्या जाधव व अॅड. सुधीर कोतवाल यांनी १३ साक्षीदार तपासले़ यामध्ये सबळ पुरावे मिळाल्याने न्यायाधीश घोडके यांनी प्रसाद कुलकर्णी यास जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली़