परतीच्या पावसामुळे द्राक्ष पिकाचे सर्वाधिक नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 07:06 PM2019-10-31T19:06:53+5:302019-10-31T19:08:24+5:30
नाशिक : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांना मोठा फटका बसला असून, लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी ३.२६ लाख हेक्टरवरील सुमारे ५० टक्के ...
नाशिक : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांना मोठा फटका बसला असून, लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी ३.२६ लाख हेक्टरवरील सुमारे ५० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. द्राक्ष आणि मका या पिकांना सर्वाधिक फटका बसला असून, इतर पिकेही संकटात आली आहेत. लागवडीखालील द्राक्षबागांपैकी सुमारे ७० टक्के द्राक्ष जमीनदोस्त झाली आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. जिल्हा प्रशासन यंत्रणा पंचनाम्याच्या कामाला जुंपली असून, पीक नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. परतीच्या पावसामुळे पंधरा तालुक्यांपैकी सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला, चांदवड, सिन्नर, देवळा या जिल्ह्यातील पूर्व तालुक्यांमधील पिकांना चांगलाच फटका बसला आहे.
त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी आणि कळवण या तालुक्यांमध्ये काही प्रमाणात द्राक्षबागांचे नुकसान झालेले आहे. मात्र सर्वाधिक नुकसान हे बागलाण, निफाड, दिंडोरी, चांदवड, मालेगाव, नांदगाव, येवला, सिन्नर या तालुक्यांमध्ये झालेले आहे. द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या भागात अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत अनेक शेतकऱ्यांच्या बागा या जमीनदोस्त झाल्या असल्याचेही दिसून आले.
जिल्ह्यात यावर्षी लागवडीखालील क्षेत्र ७.४० लाख हेक्टर इतके होते. परतीच्या पावसामुळे सुमारे ३.२६ लाख हेक्टरवरील पिकांचे म्हणजेच जवळपास ५० टक्के पिकांचे नुकसान झाले असून, यामध्ये द्राक्ष आणि मका पिकांचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे. पीकनिहाय नुकसानीचा अंदाज पाहिला तर ६० हजार हेक्टरवर लावण्यात आलेल्या द्राक्षबागा जमीनदोस्त झालेल्या आहेत. द्राक्षांचे सुमारे ७० टक्के नुकसान झाले