बाजारपेठेतील रस्ता बंद झाल्याने व्यापाऱ्यांचा नगरपालिकेवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 05:33 PM2018-02-13T17:33:49+5:302018-02-13T17:46:33+5:30
भगूर : पालिकेच्या वतीने भगूरमधील मुख्य बाजारपेठ असलेल्या रस्त्याचे खोदकाम करण्यात आल्याने बाजारपेठेत येणाऱ्या -जाणाऱ्यांचा मार्गच ठप्प झाल्याने संतप्त व्यापाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्यांना घेराव घातला.
भगूर नगरपालिकेच्या वतीने परिसरात कॉँक्रीटी रस्ते यापूर्वीच बनविले आहेत. या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठीची कामे सध्या भगूरमध्ये सुरू आहे. येथील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या मेनरोडमधील कॉँक्रिटीकरण पूर्णपणे उखडण्यात आले आहे. सदर काँक्रीटीकरण काढताना विश्वासात घेतले नसल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे. मेनरोडवरील कॉँक्रीट काढून टाकण्यात आल्यामुळे या मार्गावर चालणेही मुश्कील झाले आहे. व्यापारी आणि ग्राहकांनादेखील याचा त्रास सहन करावा लागत असून, त्याचा परिणाम व्यवसायांवर झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. रस्त्याचे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक करंजकर गल्ली मार्गे वळविण्यात आली आहे.
एकीकडे लहवित रस्त्याचे काम सुरू असल्याने इगतपुरी परिसरातील नागरिक भगूरला न येता परस्पर देवळाली कॅम्पला जात आहेत. नानेगावला मिलिटरीकडून येण्या-जाण्यास मज्जाव केला जात आहे. विंचुरी दळवी परिसरातील नागरिकही शहरात न येता परस्पर रेल्वे गेटमधून देवळाली कॅम्पकडे जात आहेत. एकंदरीत भगूर शहराची बाजार पेठ संपूर्णपणे ठप्प होत असल्याने व्यापाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम जाणवत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी पालिकेवर धडक मोर्चा काढला. मुख्याधिकारी संगीता नांदुरकर या अनुपस्थित असल्याने मुख्य लिपिक रमेश राठोड यांना घेराव घालण्यात आला.