सराईत गुन्हेगाराच्या खुनातील संशयितावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 10:59 PM2017-08-19T22:59:32+5:302017-08-19T23:04:58+5:30
नाशिक : पेठरोड परिसरातील सराईत बालगुन्हेगार हृतिक उर्फ पाप्या राजू शेरगिलच्या खुनातील प्रमुख संशयित चेतन संजय पवार (१७, शनिमंदिरशेजारी, पेठरोड, नाशिक) याच्यावर शनिवारी (दि़१९) सायंकाळच्या सुमारास तीन ते पाच संशयितांनी तिबेटीयन मार्केटमध्ये धारदार शस्त्राने हल्ला केला़ यामध्ये पवार गंभीर जखमी झाला असून, त्यास प्रथम जिल्हा रुग्णालय व त्यानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेरगिलच्या खुनातील संशयित चेतन पवार याची शनिवारी (दि़१९) उंटवाडीतील बाल न्याय मंडळात तारीख होती़ त्यासाठी पवार हा आपल्या आई-वडिलांसमवेत तारखेसाठी हजर होता़ या तारखेनंतर कपडे खरेदी करावयाचे असल्याने साडेचार वाजेच्या सुमारास तो तिबेटीयन मार्केटमध्ये गेला होता़ यावेळी मागावर असलेल्या तीन ते पाच संशयितांनी धारदार हत्याराने त्याचे डोके व पाठीवर वार करून फरार झाले़ या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चेतन पवार यास त्याचे वडील संजय पवार व सतीश वानखेडे यांनी उपचारासाठी प्रथम जिल्हा रुग्णालय व त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल केले़
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त डॉ़राजू भुजबळ व सरकारवाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते़ या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे तसेच त्यांना शोधण्यासाठी पोलीस पथकही रवाना करण्यात आले आहे़ दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता़
शेरगिल खुनातील प्रमुख संशयित
पंचवटी परिसरात दहशत, प्राणघातक हल्ला, खून, हाणामारी, लूटमार, मोबाइल चोरीचे गुन्हे दाखल असलेला सराईत बालगुन्हेगार हृतिक उर्फ पाप्या राजू शेरगिल (१६) याचा संशयित गणेश अशोक भल्ला (रा. दिंडोरीरोड) व दोन अल्पवयीन शाळकरी मुलांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना ७ फेबु्रवारी २०१७ रोजी पेठरोडवरील मोती सुपर मार्केटजवळ घडली होती़ या खुनातील संशयितांमध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आलेल्या चेतन पवार याचाही समावेश होता़