‘रेल्वे’ हाच ठरला त्यांचा अखेरचा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 07:04 PM2018-05-09T19:04:02+5:302018-05-09T19:04:02+5:30
पंचवटी एक्स्प्रेसच्या नवीन गाडीचे स्वप्न पाहणाऱ्या आणि त्यासाठी गेल्या वर्षभरापासून धडपडणाºया बिपीन गांधी यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले असताना, गाडीच्या स्वागतासाठी आतुर असलेल्या गांधी यांना गाडी स्थानकावर येण्यापूर्वीच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. नव्या रूपातील पंचवटी एक्स्प्रेस धावताना पाहण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले.
नाशिक : पंचवटी एक्स्प्रेसच्या नवीन गाडीचे स्वप्न पाहणाऱ्या आणि त्यासाठी गेल्या वर्षभरापासून धडपडणाºया बिपीन गांधी यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले असताना, गाडीच्या स्वागतासाठी आतुर असलेल्या गांधी यांना गाडी स्थानकावर येण्यापूर्वीच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. नव्या रूपातील पंचवटी एक्स्प्रेस धावताना पाहण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. रेल्वेच्या प्रश्नावर सातत्याने लढणारे गांधी यांचा रेल्वे हाच अखेरचा श्वास ठरला.
रेल्वे प्रवासी आणि रेल्वे प्रश्नांवर गेल्या तीस वर्षांपासून सातत्याने लढणाºया गांधी यांनी अखेरचा श्वासही रेल्वेस्थानकावरच घेतल्याने त्यांच्या अशा अकाली मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला. नव्या रूपातील पंचवटी एक्स्प्रेसच्या स्वागतासाठी गांधी बुधवारी पहाटेपासून रेल्वेस्थानकावर हजर होते. गाडीच्या स्वागतासाठी ते अतिशय उत्साही आणि तीव्र आतुर होते. गेल्या दोन दिवसांपासून ते पंचवटीच्या स्वागताच्या तयारीला लागले होते. काल रात्री तर ते पुरेसे झोपूही शकले नव्हते. ज्या गाडीसाठी गेल्या वर्षभरापासून त्यांची धडपड सुरू होती ती गाडी प्रत्यक्षात नाशिकरोड स्थानकावर येणार असल्याने त्यांना अतिशय आनंद झाला होता. हार-तुरे, ढोलताशा घेऊन गांधी आणि त्यांचे सहकारी रेल्वेस्थानकावर हजर होते. परंतु नाशिकरोड स्थानकावर गाडी येण्यापूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना नव्या गाडीतून प्रवास करता आला नाही, तर त्यांनी इहलोकाच्या प्रवासाची वाट धरली.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गांधी यांना पंचवटी एक्स्प्रेसविषयी भावना व्यक्त करण्यास सांगितले असता त्यांनी आपले एक स्वप्न साकार झाल्याचे सांगत आता पुढील जबाबदारी प्रवाशांची असल्याचे म्हटले आणि काही क्षणातच ते खाली कोसळले. त्यांना तातडीने नाशिकरोडच्या जयराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.