नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे कापले दुचाकीस्वाराचे नाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 07:40 PM2018-01-13T19:40:00+5:302018-01-13T19:41:50+5:30
नाशिक : दुचाकीवरून जात असलेल्या चालकाचे नायलॉन मांजामुळे नाक कापले गेल्याची घटना शनिवारी (दि़१३) सकाळी सिडकोतील कामटवाडे परिसरात घडली आहे़ राधेश्याम पांडे (५०, रा. अंबड लिंकरोड) असे नाक कापले गेलेल्या इसमाचे नाव असून नायलॉन मांजामुळे नाकास तब्बल सात टाके पडले आहेत़
अंबड - लिंकरोड परिसरातील पांडे हे सकाळी दुचाकीवरून त्रिमूर्ती चौकाकडे दुचाकीवरून जात होते़ त्यावेळी अचानक त्यांच्या तोंडासमोर मांजा आल्याने त्यांचे नाक कापले जाऊन ते खाली पडले़ यावेळी परिसरातील नागरिकांनी त्वरीत धाव घेऊन डॉ़दिनेश भामरे यांच्याकडे प्राथमिक उपचारासाठी नेले़ मात्र, त्यानंतरही रक्तस्त्राव सुरूच असल्याने पांडे यांना मोरे हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर उपचारासाठी नाकास सात टाके टाकावे लागले़
दरम्यान, पांडे यांच्या नाकाऐवजी त्यांच्या गळ्यास जर मांजा लागला असता तर त्यांचा गळाच कापला जाऊन मोठी दुर्घटना घडली असती मात्र सुदैवाने ते वाचले़ या घटनेमुळे सिडकोत सर्रास नायलॉन मांजाचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे़ पक्षीप्रेमी व पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही नायलॉन मांजाचा वापर केला जातो आहे़ त्यामुळे पोलिसांनी आता नायलॉन मांजा बाळगणा-यांवरच गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे़
छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री
सिडको परिसरासह संपूर्ण शहरात चोरी - छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री सुरूच असून विक्रेत्यांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या जात आहेत़ यापुर्वी शहर गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यांमध्ये फुल तसेच पादत्राणे विक्रीच्या दुकानात हा मांजा ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे़ विशेष म्हणजे दुकानात नायलॉन मांजा न ठेवता दुसरीकडे ठेवून ग्राहकाकडून संपूर्ण पैसे घेतल्यानंतर त्यास चोरी-छुप्या पद्धतीने दिला जातो़