लिफ्टच्या बहाण्याने वृद्धांचे दागिने लुटणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 08:42 PM2017-09-02T20:42:34+5:302017-09-02T20:47:37+5:30
नाशिक : बसस्टॅण्ड तसेच रिक्षास्टॅण्डवर बसची वाट पाहणाºया वृद्ध महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना घरी सोडण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन दागिने लूटणारा संशयित योगेश सतिश कदम (२३, रा़दिक्षीरोड, ओझर, ता़निफाड, जि़नाशिक) यास आडगाव पोलिसांनी शनिवारी (दि़०२) सापळा रचून अटक केली़ कदम याने तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यापैकी एका गुन्ह्यातील लाख रुपयांची सोन्याची पोत त्याच्याकडून जप्त केल्याची माहिती माहिती सहायक पोलीस आयुक्त विजयकु मार चव्हाण व आडगावचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली़
दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावी जाण्यासाठी बसची वाट पाहत असलेल्या सईबाई बोडके (५५) या महिलेसोबत संशयित कदम याने ओळख करून घेत तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून आडगाव शिवारातील म्हसरूळ -आडगाव लिंकरोडवर नेले़ याठिकाणी बोडके यांच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किमतीच्या ४ तोळे वजनाच्या दोन सोनसाखळ्या काढून घेतल्याची घटना मंगळवारी (दि़२९) दुपारी घडली होती़ या घटनेस एक दिवस उलटत नाही तोच पुन्हा बुधवारी (दि़ ३०) पुन्हा पिंपळगाव येथील विठाबाई रघुनाथ मोरे (६६) या वृद्धेस घरी सोडण्याच्या बहाण्याने कदम याने नवव्या मैलावर निर्जनस्थळी नेऊन त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची पोत लुटून नेली होती़
वृद्धांना लुटण्याच्या या दोन घटनांनंतर आडगावचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर तसेच ग्रामीण भागातील रिक्षा तसेच बसस्टॉपवर पाळत ठेवली जात होती़ त्यातच गुप्त बातमीदाराद्वारे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित कदम यास अटक केली़ त्याच्याकडून विठाबाई मोरे यांची लूट केलेली सोन्याची पात तोळ्याची पोतही जप्त करण्यात आली आहे़ संशयित कदम याने ओझर तसेच आडगाव पोलीस ठाणे हद्दीत एकूण तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे़ आडगाव गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील, पोलीस हवालदार मुनीरोद्दीन काझी, पोलीस नाईक अनिल केदारे, पोलीस शिपाई मनोज खैरे, वैभव खांडेकर, नकुल जाधव यांनी ही कामगिरी केली़
लूटीसाठी अफलातून आयडीया
बसस्टॅण्ड, रिक्षास्टॅण्ड या ठिकाणी अंगावर सोन्याचे दागिने असणाºया वृद्ध महिलांशी ओळख काढत संशयित कदम हा त्यांचा विश्वास संपादन करायचा़ त्यानंतर या महिलांना आपल्या दुचाकीवर (एमएच १५, ईव्ही ९३९७) वर बसवून सोडण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी घेऊन जात असे़ यानंतर चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून फरार होत असे़ संशयित कदम याने लुटण्यासाठी अशी अफलातून आयडीया शोधून काढली होती़ त्यामुळे वृद्ध महिलांनी अनोळखी इसमांच्या दुचाकी वाहनांवर बसू नये़
- विजयकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त, नाशिक़