मुक्त विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्रामार्फत पंतप्रधानांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 04:17 PM2018-03-20T16:17:02+5:302018-03-20T16:17:02+5:30
भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्यावतीने कृषी उन्नती मेळावा आणि भारतातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कृषी चर्चासत्रा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभासी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
नाशिक : भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्यावतीने कृषी उन्नती मेळावा आणि भारतातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कृषी चर्चासत्रा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभासी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषीविज्ञान केंद्राने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले.
मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांसाठी निरनिराळे प्रकल्प राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना मोठ्या पडद्यावर पंतप्रधानांचेशेतकऱ्यांना संबोधन पाहण्याची आणि ऐकण्याची संधी कृषी विद्यान केंद्राने शेतकऱ्यांसाठी नुकतीच उपलब्ध करून दिली होती. यासाठी नाशिक जिल्ह्यातील सुमारे तीनशेहून अधिक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन उपस्थित होते. प्रा. वायुनंदन यांनीशेतकऱ्यांना रासायनिक खतांचा मर्यादित वापर करून सेंद्रिय शेती करण्यावर भर देण्याचे आवाहन केले.शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीवर भर देताना आपल्या जमिनीचे आरोग्यही सांभाळणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रत्येक शेतºयांकडे जमीन आरोग्य पत्रिका असणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विद्यान केंद्रात उपलब्ध माती आणि पाणी परीक्षण सुविधेचा लाभ घ्यावा व आवश्यकतेनुसारच रासायनिक खतांचा वापर करावा असे सांगितले. यावेळी शेतकऱ्यांना शेळीपालन या विषयावर केंद्राचे पशुसंवर्धन तज्ञ डॉ. श्याम पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रस्ताविक केंद्राचे प्रमुख राजाराम पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन केंद्राचे उद्यानविद्या तज्ञ प्रा. हेमराज राजपूत यांनी केले.