नाशिकमध्ये पल्सर दुचाकीवरील संशयिताने खेचले महिलेचे मंगळसूत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 03:55 PM2017-12-18T15:55:00+5:302017-12-18T15:59:03+5:30
इंदिरानगर : सायंकाळी फेरफटका मारणा-या दोन महिलांपैकी एकीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना रविवारी (दि़१७) सायंकाळच्या सुमारास इंदिरानगरमधील राजसारथी सोसायटीजवळ घडली़
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीमा रामचंद्र गिधाडे (३२, रा़ देवांग कॉम्प्लेक्स, बापू बंगला, इंदिरानगर) या सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मैत्रीण भाग्यश्री जोशीसोबत फेरफटका मारत होत्या़ राजसारथी सोसायटीच्या पाठीमागून बजरंग सोसायटीच्या रस्त्याने पायी जात असताना समोरून एक काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवर दोघे संशयित आले़ पल्सर दुचाकीचालकाने महिलांजवळ जाऊन वाहनाचा वेग कमी केला तर पाठीमागे बसलेल्या संशयिताने सीमा गिधाडे यांच्या अंगावरील ४२ हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र खेचून नेले़ यानंतर सीता गिधाडे यांनी आरडाओरड करताच संशयित वडाळागावच्या दिशेने फरार झाले़
या प्रकरणी सीता गिधाडे यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़