पूर्ववैमनस्यातूनच सराईत गुन्हेगार मोरेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 11:27 PM2017-08-18T23:27:18+5:302017-08-18T23:30:15+5:30
पंचवटी : दिंडोरी रोडवरील (कलानगर) येथे चार ते पाच संशयितांनी सराईत गुन्हेगार तथा अखिल भारतीय सेनेचा शहर अध्यक्ष निखिल ऊर्फ बाल्या मनोहर मोरे (२८) याची पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी (दि. १७) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चार-पाच संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरिफ कुरेशी व सागर चंद्रमोरे या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कलानगर परिसरातील निखिल मोरे याचा परिसरातच राहणारे संशयित आरोपी आरिफ कुरेशी, शरद पगारे, अमर गांगुर्डे, रोशन पगारे व त्यांच्या अन्य साथीदारांबरोबर पूर्वी वाद झाले होते. गुरुवारी (दि. १७) रात्री दहा वाजता सूरज खोडे, मयत निखिल मोरे, अमोल निकम हे कलानगर येथील व्यंकटेश कृपा अपार्टमेंट येथील हॅपी गेम झोन दुकानाच्या पायरीवर बसलेले होते़ त्यावेळी संशयित जॉन काजळे हा तिथे आला व निखिल मोरे यास तू प्रवीण काकडला आरिफ यास मारण्यास सांगतो असे म्हणून हातातील धारदार शस्त्राने मोरे याच्यावर वार केले़
यानंतर संशयित शरद पगारे याने हातातील पिस्तुलातून तीन गोळ्या हवेत झाडल्या, तर मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या अमोल निकम व फिर्यादी खोडे यांच्यावरही अमर गांगुर्डे याने शस्त्राने वार केल्याने ते जखमी झाले़ तर आरिफ कुरेशी याने मोरेवर हातातील शस्त्राने वार केले. यानंतर संशयित पसार झाले. या घटनेचे वृत्त कळताच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख, आनंदा वाघ, सुनीलकुमार पुजारी यांनी घटनास्थळी भेट दिली होती. या घटनेनंतर जखमी मोरेला दिंडोरी रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले़
या प्रकरणी सूरज फकिरा खोडे याने दिलेल्या फिर्यादीनुसार म्हसरूळ पोलीस ठाण्यात चार ते पाच संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पगारे, कुरेशी तडीपाऱ़़
सराईत गुन्हेगार निखिल मोरे याच्या खुनातील संशयित आरिफ कुरेशी यास काही दिवसांपूर्वीच शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते, तसेच त्याची तडीपारीची मुदत संपली होती. तर संशयित शरद पगारे यास पंधरवड्यापूर्वी म्हसरूळ पोलिसांनी तडीपार केले होते. मात्र, पगारे हा केवळ कागदोपत्री तडीपार होता. त्याचे वास्तव्य म्हसरूळ परिसरातच असल्याचे या प्रकरणामुळे स्पष्ट झाले असून, म्हसरूळ पोलिसांना याची माहिती कशी मिळाली नाही? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते आहे़
मोरे सराईत गुन्हेगाऱ़़
पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आलेला निखिल ऊर्फ बाल्या मोरे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, काही वर्षांपूर्वी कलानगर येथे भगवान सानप, ठक्कर बजार येथे गुणाजी जाधव या दोघांच्याही खून प्रकरणात मोरे याचा सहभाग असल्याने त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते़ तर काही दिवसांपूर्वीच पंचवटी पोलिसांनी महाबळेश्वर येथून अटक केलेला सराईत गुन्हेगार व्यंकटेश मोरे याचा मयत निखिल मोरे हा चुलतभाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस अधिकाºयांचे मोरे सोबतचे फोटो व्हायरल़़़
सराईत गुन्हेगार तथा अखिल भारतीय सेना शहर अध्यक्ष मयत निखिल मोरे याने काही दिवसांपूर्वीच म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांच्या समवेत एका कार्यक्रमाच्या ठिकाणी फोटो सेशन केले होते. मोरेच्या खुनानंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी व निखिल मोरे यांच्यात जवळीक असल्याची चर्चा आहे.