पाथर्डी फाट्यावर सर्पमित्रालाच सर्पदंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:30 PM2017-08-22T23:30:39+5:302017-08-22T23:33:47+5:30
इंदिरानगर : विषारी नाग पकडल्यानंतर बरणीत टाकत असताना त्याने केलेल्या दंशामुळे सर्पमित्राची प्रकृती गंभीर झाल्याची घटना मंगळवारी (दि़२२) दुपारच्या सुमारास वडाळा-पाथर्डी रस्त्यावर घडली़ आप्पा पंढरीनाथ उगले (२८, दत्तमंदिर परिसर, पाथर्डीगाव) असे या सर्पमित्राचे नाव असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी गावातील सर्पमित्र आप्पा पंढरीनाथ उगले हे दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वडाळा-पाथर्डी रस्त्याने जात होते़ त्यांना भवानी मंदिराजवळ काही नागरिकांची गर्दी दिसली. त्यांनी जवळ जाऊन बघितले असता विषारी नाग असल्याचे दिसले़ या नागास मोठ्या कौशल्याने त्यांनी पकडले व नेहमीप्रमाणे बरणीत टाकत असताना त्याने उजव्या हाताला दंश केला़
यामध्ये उगले यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, या घटनेची इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़