पोलीस असल्याची बतावणी करून लुटणा-या ठाण्यातील संशयितास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 10:03 PM2018-01-15T22:03:13+5:302018-01-15T22:07:27+5:30
नाशिक : पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणा-या ठाण्यातील तोतया पोलिसास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ अलीमिर्झा दरवेश जाफरी (३८, रा़ शांतीनगर, पिरानीपाडा, भिवंडी, जि़ ठाणे) असे या तोतयाचे नाव असून, शहरातील तीन लुटींची त्याने कबुली दिली आहे़ पोलिसांनी या लुटीतील ९० हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे़
नाशिक : पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणा-या ठाण्यातील तोतया पोलिसास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ अलीमिर्झा दरवेश जाफरी (३८, रा़ शांतीनगर, पिरानीपाडा, भिवंडी, जि़ ठाणे) असे या तोतयाचे नाव असून, शहरातील तीन लुटींची त्याने कबुली दिली आहे़ पोलिसांनी या लुटीतील ९० हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे़
पुढे खून झाला आहे, रेड पडली आहे असे सांगून पोलिसाचे खोटे ओळखपत्र दाखवून महिलांच्या अंगावरील मौल्यवान दागिने वा वृद्धांचे पैसे काढून घेत त्यांची लूट करण्याचे प्रकार शहरात घडलेले आहेत़ या प्रकारचे गुन्हे करणा-या संशयित जाफरीबाबत शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे, हवालदार बाळासाहेब दोंदे यांना माहिती मिळाली होती. वरिष्ठ अधिकारी आणि युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने भिवंडी (जि. ठाणे) येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित जाफरी यास अटक केली.
संशयित जाफरी याने नाशिकमधील पोलीस असल्याची बतावणी करून तीन गुन्हे केल्याची कबुली दिली असून, यामध्ये त्याने मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी जात असलेल्या वृद्धाला पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवून पुढे छापा पडला आहे, असे सांगत त्यांची झडती घेतली आणि त्यांच्याकडील ५० हजार रुपये रोख व सोन्याची अंगठी असा ऐवज हातचलाखी करून चोरून नेला होता. दुसरी घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलीस असल्याचे सांगून गांजा पकडला आहे. त्यामुळे अंगझडती घेत एकाच्या गळ्यातील सोन्याची साखळी व दोन अंगठ्या लंपास केल्या. तर तिसºया घटनेत मेळा बसस्थानक परिसरात वृद्धेला सोन्याच्या दागिन्यांच्या बदल्यात सोन्याचे बिस्किट देण्याची बतावणी करून तिच्याकडील सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. सदरचा चोरीचा सुमारे ९० हजार रुपयांचा ४५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, गुन्हे शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक निरीक्षक सचिन खैरनार, महेश कुलकर्णी, दीपक गिरमे, उपनिरीक्षक चंद्रकांत पळशीकर, जाकीर शेख, संजय पाठक, पोपट कारवाळ, बाळासाहेब दोंदे, अनिल दिघोळे, संजय मुळक, वसंत पांडव, रवींद्र बागुल, आसिफ तांबोळी, मोहन देशमुख, संतोष कोरडे, रावजी मगर, गणेश वडजे, स्वप्नील जुंद्रे, नीलेश भोईर, राहुल पालखेडे, प्रवीण चव्हाण, प्रतिभा पोखरकर, संजय सूर्यवंशी, दीपक जठार यांच्या पथकाने ही कामगिरी केली़