नाशिकमध्ये पोस्टमनकडून आधार कार्डचा ‘बाजार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 06:57 PM2018-03-18T18:57:34+5:302018-03-18T18:57:34+5:30
नाशिकरोड टपाल खात्याच्या अंतर्गत असलेल्या टपाल कार्यालयाकडून आलेल्या आधार कार्डाचा संबंधित पोस्टमनकडून बटवडा होत नसून, सदर कार्ड जवळच्या दुकानदारांच्या स्वाधीन केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिकांना वेळेवर आधार कार्ड मिळत नाहीच, शिवाय संबंधित विक्रेत्यांकडून आधार कार्डचे वीस रुपये आकारले जात असल्याचे बोलले जात आहे.
नाशिक : नाशिकरोड टपाल खात्याच्या अंतर्गत असलेल्या टपाल कार्यालयाकडून आलेल्या आधार कार्डाचा संबंधित पोस्टमनकडून बटवडा होत नसून, सदर कार्ड जवळच्या दुकानदारांच्या स्वाधीन केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिकांना वेळेवर आधार कार्ड मिळत नाहीच, शिवाय संबंधित विक्रेत्यांकडून आधार कार्डचे वीस रुपये आकारले जात असल्याचे बोलले जात आहे.
आधार कार्डातील त्रुटी दूर करण्यासाठी शासनाने शहरात ठिकठिकाणी केंद्रे सुरू केली आहेत. ज्याच्या आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्याचे काम संबंधित केंद्रांवर केले जाते. दुरुस्ती केलेले कार्ड टपालाच्या माध्यमातून नागरिकांना घरपोच मिळेल, असे सांगितले जाते. परंतु दुरुस्ती केल्यानंतही दोन ते तीन महिने ग्राहकांना दुरुस्ती केलेले आधार कार्ड मिळतच नसल्याचा अनेकांना अनुभव आहे. यासंदर्भात टपाल कार्यालयाकडे तक्रार करूनही ग्राहकांना अजून आधार कार्ड मिळालेले नाही. ही परिस्थिती केवळ नाशिकरोडची नव्हे तर गांधीनगर, उपनगर, अशोकामार्ग, टाकळी येथील नागरिकांची तक्रार आहे.
नाशिकरोडमधील गोसावीवाडी, पवारवाडी, गुलाबवाडी, राजवाडा, देवळालीगाव परिसरातील अनेक नागरिकांना आधार कार्ड मिळाले नसल्याची तक्रार आहे. टपालचा बटवडा करणारे पोस्टमन घरोघरी दुरुस्ती केलेले आधार कार्ड वितरित करीत नसून एखाद्या दुकानात संपूर्ण परिसरातील कार्ड देऊन निघून जात असून, संबंधित दुकानदार कार्ड घेण्यासाठी येणाऱ्याकडून पैसे उकळत असल्याची तक्रार नोंदविण्यात आलेली आहे. हा सारा गैरप्रकार होत असताना टपाल खात्याचे मात्र याकडे लक्ष नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.