इंधन दरवाढीविरोधात दे धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 05:43 PM2021-06-15T17:43:10+5:302021-06-15T17:45:58+5:30
लॉकडाऊनमुळे जनतेचे दरडोई उत्पन्न घटलेले आहे. रोजगाराची मोठी चिंता निर्माण झाली असून, उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गडगडले असतानाही भारतात मात्र इंधनाचे दर वाढत असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.
नाशिक : पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर, घरगुती सिलिंडरच्या दरात झालेली वाढ तसेच खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्याच्या निषेधार्थ बहुजन मुक्ती मोर्चा पार्टीच्यावतीने वाहनांना धक्का मारत इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी दुचाकीला धक्का मारत केंद्र शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.
देशात पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका उडालेला आहे. तेलाच्या किमतीदेखील २०० पार झाल्या असून, दैनंदिन जीवनाश्यक वस्तूंच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. या महागाईमुळे जनता होरपळून निघत असल्याचा आरोप करीत बहुजन मुक्ती मोर्चाच्यावतीने केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. शिवाजीरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धक्का मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
लॉकडाऊनमुळे जनतेचे दरडोई उत्पन्न घटलेले आहे. रोजगाराची मोठी चिंता निर्माण झाली असून, उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गडगडले असतानाही भारतात मात्र इंधनाचे दर वाढत असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. देशातील महागाई कमी करण्यासाठीची पावले उचलावीत, यासाठी बहुजन मुक्ती युवा आघाडी, बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीच्यावतीने आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
आंदोलनात ॲड. सुजाता चौदंते, सविता खैरनार, अक्षय अहिरे, सागर साळवे, राजेंद्र गायकवाड, शरद साळवे, अजय वाघ, वसंत महाले आदी उपस्थित होते.