बॅँकांसमोर खातेदारांच्या रांगा; सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 03:59 PM2020-04-07T15:59:23+5:302020-04-07T16:00:39+5:30
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सर्वसामान्य आणि आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांपुढे आर्थिक प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी महिलांच्या ...
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सर्वसामान्य आणि आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांपुढे आर्थिक प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी महिलांच्या जनधन खात्यात ५०० रुपये जमा झाल्याने सदर रक्कम काढण्यासाठी बॅँकांबाहेर महिला खातेधारकांची गर्दी होऊ लागली आहे. काही ठिकाणी सोशल डिस्टन्स मेन्टेन करणे कठीण झाले आहे, तर काही बॅँकांच्या व्यवस्थापनाने वेळेचे आणि गर्दीचे नियोजन केल्याचेही दिसून आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाउनचा काळ सुरू असल्याने सर्वसामान्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. दैनंदिन कामकाज करून रोजीरोटी भागविणाऱ्या वर्गाला या लॉकडाउनचा फटका बसत असल्याने अशा घटकासाठी अनेक संस्था, संघटनांनी मदतीचा हात पुढे केला आहे, तर केंद्र शासनानेदेखील महिलांच्या जनधन खात्यात ५०० रुपये जमा केले आहे. पीएम किसान योजनेचेदेखील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. त्याप्रमाणेच १ ते ७ तारखेपर्यंत अनेक शासकीय सेवानिवृत्त कर्मचाºयांचे पेन्शनदेखील आलेले आहेत. त्यामुळे बॅँकांमध्ये एकच गर्दी झाल्याचे दिसून आले.
मागील आठवड्यापासून बॅँकांमध्ये दाखल झालेल्या रकमा काढून घेण्यासाठी महिला खातेदारांची गर्दी होत आहे. शहर आणि जिल्ह्यातील १२ राष्टÑीयीकृत बॅँकांमध्ये असलेल्या जनधन खात्यात पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे पैसे काढण्यासाठी दिवसेंदिवस गर्र्दी वाढतच आहे. शनिवार आणि रविवार शासकीय सुटी असल्याने बॅँका बंद होत्या. सोमवारी महावीर जयंतीची शासकीय सुटी होती. त्यामुळे मंगळवारी बॅँका उघडल्यानंतर बॅँकांसमोर रांगाच रांगा लागल्या होत्या. शहरातील शासकीय बॅँकांबाहेर तसेच एटीएमच्या बाहेरदेखील महिला खातेदारांच्या रांगा दिसून आल्या.