आरोग्य विद्यापीठात पहिली संशोधन परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 08:24 PM2018-01-03T20:24:24+5:302018-01-03T20:27:27+5:30
कुलगुरूंच्या हस्ते उद्घाटन : विविध विद्याशाखांच्या मान्यवरांचे मार्गदर्शन
नाशिक : आरोग्य शिक्षणातील संशोधनाला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय संशोधन परिषदेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते झाले. विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या एकदिवसीय परिषदेत विविध विद्याशाखांतील तज्ज्ञांनी संशोधनाच्या तांत्रिक मुद्द्यावर मार्गदर्शन केले.
उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर म्हणाले, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर संशोधन प्रकल्प नामांकित होण्यासाठी विद्यार्थ्यांनी दर्जेदार संशोधनासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. संशोधनाच्या मान्यतेसाठी नेहमीच काही त्रुटी राहतात. या त्रुटी दूर करून प्रकल्प सादर केल्यास मान्यता देणे सुलभ होते, असे कुलगुरू म्हणाले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन प्रकल्प सादर करताना इच्छुक संशोधकांनी विहित नमुन्यात, योग्य पद्धतीचा तसेच संबंधित प्रकल्पासाठी आखून दिलेल्या नियमावलीचा अवलंब करून प्रकल्प सादर केले पाहिजे. परंतु आजही अनेक प्रकल्प संशोधकाने योग्य पद्धतीने सादर केले जात नसल्याने मान्यता प्रदान करताना अडचणी येतात. यासाठी सर्व संशोधकांनी प्रकल्प सादर करताना बारीकसारीक बाबींची काळजी घेतली पाहिजे, असे कुलगुरू म्हैसेकर म्हणाले.
प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर म्हणाले, विद्यार्थी व अध्यापकांमध्ये संशोधनवृत्ती वाढीस लागावी यासाठी विद्यापीठातर्फे राज्यात नाशिकसह नवी मुंबई, पुणे व नांदेड या ठिकाणी राज्यस्तरीय संशोधन परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. राज्यस्तरीय आरोग्य विज्ञान शिक्षण तंत्रज्ञान संशोधन परिषदेमध्ये विद्यापीठाच्या वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम विद्याशाखेतील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आहे. या कार्यशाळेत विविध विद्याशाखेतील पदवी व पदव्युत्तर, पीएचडी, विद्यार्थी व अध्यापक यांनी सहभाग नोंदविला आहे.
दरम्यान, या परिषदेमध्ये संशोधनाला चालना मिळण्यासाठी आंतरविद्यासंशोधन विभाग, योगशास्त्र, सार्वजनिक आरोग्य पोषणशास्त्र या विषयांवर सहभागी विद्यार्थी व आध्यापकांना संबंधित विषयातील तज्ज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन केले. या पहिल्या राज्यस्तरीय आरोग्य विज्ञान शिक्षण तंत्रज्ञान संशोधन परिषदेच्या समारोप सत्रात महात्मा गांधी दंत महाविद्यालयाचे डॉ. त्रिवेणी काळे, अहमदनगरचे वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्राजक्ता घाटगे, पुण्याचे संचेती कॉलेज आॅफ फिजिओथेरपीचे डॉ. अपूर्ण शिंपी, ठाण्याचे राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. स्वप्नील कदम यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.