अनधिकृत वीटभट्ट्या बंद करण्याचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 10:35 PM2018-03-28T22:35:08+5:302018-03-28T22:35:08+5:30
ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या वीटभट्ट्या बंद करण्याचा ठराव लाडची ग्रामपंचायतीने केला असून, यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनादेखील देण्यात आले आहे. अनधिकृत वीटभट्ट्यांमुळे परिसरातील शेतपिकांचे नुकसान होत असल्याचे सरपंच रेखा कडाळे यांनी सांगितले.
नाशिक : ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या वीटभट्ट्या बंद करण्याचा ठराव लाडची ग्रामपंचायतीने केला असून, यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनादेखील देण्यात आले आहे. अनधिकृत वीटभट्ट्यांमुळे परिसरातील शेतपिकांचे नुकसान होत असल्याचे सरपंच रेखा कडाळे यांनी सांगितले.
नाशिक तालुक्यातील गिरणारेजवळील लाडची येथील ग्रामपंचायतीने परिसरातील वीटभट्टीविरोधात ठराव मंजूर करताना वीटभट्ट्यांमुळे नागरिकांच्या आणि शेतपिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे म्हटले आहे. या परिसरात अनेक वीटभट्ट्या अनधिकृत सुरू असल्याचे सरपंच कडाळे यांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायत हद्दीच्या परिसरात अनेक वीटभट्ट्या या अनधिकृत आहेत. नियमानुसार व्यवसाय सुरू करताना संबंधित ग्रामपंचायतीची परवानगी घेणे अपेक्षित होते; परंतु एकाही वीटभट्टीचालकाने परवानगीसाठीचा म्हणजेच ना हरकत दाखल्यासाठी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे या सर्व वीटभट्ट्या अनधिकृत असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.
यासंदर्भात ग्रामपंचायतीने ठराव करून व्यवसाय करण्यास नकार देण्यात आला आहे. या व्यवसायाच्या ठिकाणी अनेक मजूर बाहेरगावचे आणले जातात. या मजुरांची कोणतीही आरोग्य तपासणी केली जात नाही तसेच त्यांच्या राहण्याच्या ठिकाणीदेखील अस्वच्छता असते. त्यामुळे गावात आजार पसरण्याची भीती असून, या प्रकरणी वीटभट्टी मालकदेखील बेफिकिरीने वागत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय वीटभट्टीतून उडणाºया राखेच्या कणांमुळे परिसरातील पिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत.
या सर्व प्रकरणांमुळे लाडची ग्रामपंचायतीने सदर व्यवसाय बंद करण्याचा ठराव केला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन देण्यात आले असून, याप्रसंगी लाडची गावच्या सरपंच रेखा कडाळे, सुनील कडाळे, उपसरपंच मुरलीधर पारधी, सदस्य राजाराम कडाळे, अनुसया मोरे, सावळीराम फसाळे तसेच बहुसंख्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.