जिल्हा परिषदेच्या उपाययोजनांची सीईओंकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 02:56 PM2020-04-08T14:56:57+5:302020-04-08T14:59:52+5:30
नाशिक : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विविध उपाययोजना सुरु असताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ...
नाशिक : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विविध उपाययोजना सुरु असताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी मंगळवारी पेठ तालुक्याला भेट दिली पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतींना भेट देवून त्यांनी कोरोनाबाबत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने दिलेल्या सर्व निर्देशांची अंमलबजावणी करतानाच ग्रामीण भागात कोणताही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. या संकटकाळात ग्रामपंचायत स्तरावर काम करीत असलेल्या सर्व कर्मचारीवर्गाचे त्यांनी कौतूक करून स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.ग्रामीण पातळीवर या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध उपाययोजना करण्यात येत असून याचा जिलहास्तरावरुन दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर आरोग्य कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून जिल्हास्तरावर यासाठी ८ अधिका-यांची नियुक्ती करुन विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी पंचायत समिती पेठ येथे भेट देवून गट विकास अधिकारी,तालुका वैद्यकीय अधिकारी , बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची एकत्रित तयारी व करत असलेल्या कार्यवाही बाबत आढावा घेतला. तसेच ग्राम पंचायत भूवन येथे ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी केंद्राला तसेच धानपाडा ग्राम पंचायतला भेट दिली. यावेळी त्यांनी अमृत आहार वाटप व तयारी तसेच कोरोना जनजागृती बाबत सर्व ग्रामस्तरीय कर्मचा-यांचे कौतुक केले.