नाशकात प्रवासी महिलेवर रिक्षाचालकाचा बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 02:38 PM2017-09-12T14:38:14+5:302017-09-12T14:38:14+5:30
आडगाव नाक्यावरील घटना : :
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : घरी जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या महिलेस नवीन आडगाव नाक्यावरील बसडेपो मागे नेऊन मारहाण करून बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे या प्रकारास पाच दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर नराधम रिक्षाचालकाने पुन्हा पिडीत महिलेला द्वारका येथून बळजबरीने रिक्षात बसविण्याचा प्रयत्न केला असता महिलेने पळ काढून पतीस सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रिक्षाचालकास ताब्यात घेण्यात आले आहे़
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरातील ३८ वर्षीय महिला मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते़ गुरुवारी (दि़६) दुपारी चार वाजेच्या सुमारास पिडीत महिला घरी जाण्यासाठी कन्नमवार पुलाजवळ उभी होती़ द्वारकेकडून आलेल्या एका रिक्षाचालकास तिने थांबवून बस डेपोजवळ जायचे आहे असे सांगितले़ यानंतर रिक्षात बसल्यानंतर रिक्षाचालकाने रिक्षा आडगाव नाक्यावरील बस डेपोच्या पाठीमागे नेऊन महिलेस मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर या महिलेने भितीपोटी या प्रकाराची वाच्यता न करता घरी निघून गेली़
महिलेवर बलात्काराच्या घटनेस पाच दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर सोमवारी (दि.११) पिडीत महिला द्वारका येथे रिक्षाची वाट बघत असतांना पुन्हा तोच नराधम रिक्षाचालक तिथे आला व त्याने महिलेस पुन्हा बळजबरीने रिक्षात बसविण्याचा प्रयत्न केला़ मात्र, गतवेळच्या कटू अनुभवामुळे महिलेने सावधगिरी बाळगत स्वत:ची सुटका करून पळ काढला व संपूर्ण प्रकाराची माहिती आपल्या पतीला दिली़ यानंतर महिलेने पतीसह पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेत आपबिती कथन केली़ याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात त्या नराधम रिक्षाचालकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.