स्वच्छ अभियानासाठी जिल्हा परिषदेची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 10:37 PM2018-08-23T22:37:07+5:302018-08-23T22:39:18+5:30
केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक ग्रामस्थांनी आॅनलाइन प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी जिल्हा परिषद यंत्रणेची धावाधाव सुरू असून, प्रतिक्रियांमध्ये आघाडी राखण्यासाठी कुटुंब संपर्क अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
नाशिक : केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक ग्रामस्थांनी आॅनलाइन प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी जिल्हा परिषद यंत्रणेची धावाधाव सुरू असून, प्रतिक्रियांमध्ये आघाडी राखण्यासाठी कुटुंब संपर्क अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
जिल्हा परिषदेकडून स्वच्छ सर्वेक्षण अभियानातून जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे. सदर उपक्रमांमुळे सद्यस्थितीत नाशिक राज्यात आघाडीवर असले तरी ही आघाडी टिकविण्यासाठी संपूर्ण यंत्रणा त्यांनी कामाला लावली आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे उपक्र म राबविण्यात येत असून केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या तपासणी समितीकडून ग्रामपंचायतीची पडताळणी करण्यात येत आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्यासाठी व आॅनलाइन प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी २४ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकाचवेळी कुटुंब संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. ‘एसएसजी१८’ या अॅपद्वारा जास्तीत जास्त नागरिकांनी स्वच्छ भारत मिशन ग्रामीणविषयी प्रतिक्रि या नोंदविण्याचे आवाहन डॉ. नरेश गिते यांनी केले आहे.
देशभरात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत १ आॅगस्ट ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यात विविध प्रकारे उपक्रम राबविण्यात येत असून, यामध्ये होत असलेल्या कामांची केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेकडून तपासणी करण्यात येत आहे. स्वच्छता अभियानास गती मिळावी व स्वच्छ सर्वेक्षणबाबत जनजागृती व्हावी यासाठी २४ आॅगस्ट रोजी मोहीम स्वरूपात कुटुंब संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा तसेच तालुका स्तरावरील खातेप्रमुख, प्रत्येक गावासाठी नियुक्त केलेले संपर्क अधिकारी, गाव स्तरावरील सर्व विभागांचे कर्मचारी यांचा सहभाग असणार आहेत. सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत मोहीम राबविण्याबाबत जिल्हा परिषदेने परिपत्रक काढले आहे.