ग्रामीण पोलीस क्रीडा स्पर्धांचा शानदार समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 11:10 PM2017-08-19T23:10:30+5:302017-08-19T23:35:09+5:30
नाशिक : ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धांचा शनिवारी (दि़१९) मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार समारोप झाला़ या क्रीडा स्पर्धेतील पुरुषांचे सांघिक विजेतेपद ग्रामीण पोलीस मुख्यालय संघाने तर महिलांमध्ये मनमाड विभागाने पटकावला,तर वैयक्तिक क्रीडा स्पर्धांमध्ये बेस्ट अॅथलिटचा किताब पुरुषांमध्ये सावळीराम शिंदे, तर महिलांमध्ये योगीता वाघ यांनी पटकाविला़ या स्पर्धेतील विजेत्यांना राष्ट्रीय धावपटू तथा अर्जुन पुरस्कार विजेती कविता राऊत व ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले़
आॅलिम्पिक अॅथलिट कविता राऊत यांनी सांगितले की, या स्पर्धांच्या माध्यमातून पोलीस दलाने ग्रामीण भागातील पोलीस खेळाडूंना संधी दिली असून, त्यांनीही संधीचे सोने केले आहे़या स्पर्धांमधूनच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतात़ खेळाडूंना आवश्यक ती मदत व सहकार्य गरजेचे असल्याचे सांगून आदिवासी पाड्यावरील एक मुलगी ते आंतरराष्ट्रीय असा स्वत:चा जीवनपटही यावेळी उलगडून दाखविला़, तर अधीक्षक संजय दराडे यांनी २४ तास कर्तव्यावर असणाºया पोलिसांवरील ताणतणाव कमी व्हावा त्यांचे आरोग्य चांगले व्हावे, सांघिक भावना वाढीस लागावी यासाठी स्पर्धा उपयुक्त असल्याचे सांगून परिक्षेत्र व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरणाºया खेळाडूंचे कौतुक केले़
प्रारंभी महिला व पुरुषांचे १०० मीटर धावण्याची स्पर्धा संपन्न झाली़ या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, हर्ष पोद्दार, पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे, दिलीप पगार, राखीव पोलीस निरीक्षक एन. बी. भदाणे, कोळी यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समालोचन पोलीस निरीक्षक विलास सोनवणे व प्राध्यापक सोपान देशमुख यांनी केले.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
सुरगाणा तालुक्यातील सराड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शासकीय आश्रमशाळा व पेठ येथील पारंपरिक आदिवासी लोकनृत्य मंडळ यांनी आदिवासी व पावरी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली, तर निफाड तालुक्यातील कोठुरे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर तालीम व मल्लखांब संघाने सादर केलेल्या मल्लखांबावरील विविध कसरती व प्रात्यक्षिकांनी कार्यक्रमात रंगत आणली़ यानंतर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस खेळाडूंनी शानदार संचलन करून मानवंदना दिली.
क्रीडा स्पर्धेतील विजेते
सांघिक क्रीडा प्रकार : हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डीमध्ये पोलीस मुख्यालयाचे संघ प्रथम, कळवण विभाग द्वितीय
वैयक्तिक क्रीडा प्रकार : जलतरण :- शिरीष चव्हाण (प्रथम, ), विनोद टिळे व बाळू भोर (द्वितीय), वेटलिफ्टिंग (पुरुष) : सचिन पिंगळ (प्रथम), रवींद्र टर्ले (व्दितीय), वेटलिफ्टिंग (महिला) : मनीषा खैरनार (प्रथम), बॉक्सिंग व कुस्ती (पुरुष) : सुजित म्हसदे, दशरथ पटले, कैलास मानकर, राकेश जाधव, योगेश पाटील, सुमित जाधव, प्रमोद जाधव, सुषांत मरकड, चंद्रभान झाल्टे, राजू मनोहर, बॉक्सिंग (महिला) : अस्मिता मंडई (प्रथम), मनीषा खांडेकर (द्वितीय), कबड्डी व खो-खो : कळवण (प्रथम), मनमाड (द्वितीय)