कोरोना संकटातही फुलली नाशिकची शेती- हिरव्या सोन्याने दिली अर्थचक्राला गती
By नामदेव भोर | Published: June 21, 2020 05:43 PM2020-06-21T17:43:17+5:302020-06-21T17:47:15+5:30
नाशिक जिल्ह्यातून एकीकडे मुंबईसह राज्यातील विविध भागात भाजीपाल्याचा नियमित पुरवठ्यासाठी सुरु असताना खरिपाची पूर्वतयारीही सुरू होती. या संकटाच्या काळात शेतकरी वर्गाने त्याला जगाचा पोशिंदा का म्हणतात हे खऱ्या अर्थाने दाखवून दिले
नामदेव भोर / नाशिक : कोरोना संकटात अनेक व्यवसाय, आस्थापना, उद्योग जिल्ह्यात बंद असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया असलेली शेतीनाशिक जिलह्यात दरवर्षी प्रमाणेच यावर्षीही फुलली असून कोरोना काळातील टाळेबंदीमुळे मंदावलेल्या अर्थचक्राला जिल्ह्यातील शेतीमुळेच गती मिळाल्याचे दिसून आले.
नाशिक जिल्ह्यातून एकीकडे मुंबईसह राज्यातील विविध भागात भाजीपाल्याचा नियमित पुरवठ्यासाठी सुरु असताना खरिपाची पूर्वतयारीही सुरू होती. या संकटाच्या काळात शेतकरी वर्गाने त्याला जगाचा पोशिंदा का म्हणतात हे खऱ्या अर्थाने दाखवून दिले. जिल्ह्यात ज्या काळात लॉकडाऊन होते त्याकाळातही जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतात राबत होता. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खते, बी-बियाणे, कीटकनाशके सहज उपलब्धतेचा दरवर्षीप्रमाणेच प्रश्न असताना लॉकडाऊन काळातील गैरसोयींचा सामना करून जिल्ह्यातील बळीराजाने आपली शेतील फुलवली. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रे या कालावधीत सुरू असल्याने बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे दिसून आले. मात्र वाहतुकीसाटी साधणे तसेच आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांनी स्वतःचे घरीच राखून ठेवलेले सोयाबीनचे बियाने वापरून खरीपाच्या पेरणीही सुरू केली आहे.
असा पुरविला भाजीपाला आणि फळे
लॉकडाऊन काळात सर्व काही लॉक असतांना शेतकऱ्यांनी थेट विक्री करून नागरिकांची ताज्या भाजीपाल्याची गरज पूर्ण केली. जिल्ह्यातील २७३ गट, १७ शेतकरी उत्पादक कंपनी व ६ हजार ३४० शेतकऱ्यांमार्फत नाशिकसह मुंबई, ठाणे, पुणे व या मोठ्या शहरांना दररोज १२५ ते १५० मेट्रीक टन भाजीपाला, फळे पुरविण्यात आला. लॉकडाऊन कालावधीत १५ हजार ६३२ मे. टन फळे आणि भाजीपालाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुरवठा केला. तर लॉकडाऊन काळात पाचोरा तालुक्यातील १६० टन मोसंबी व ४ टन पेरुची नाशिक जिल्ह्यात विक्री करण्यात आली.