नाशिकच्या बांधकाम व्यवसायाला कोरोनामुळे ‘स्लो-डाऊन’चा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 05:07 PM2020-03-29T17:07:08+5:302020-03-29T17:09:09+5:30
बांधकाम क्षेत्रासाठी यंदाचा गुढीपाडवा पुन्हा कधीच उगवू नये, असाच ठरला. संचारबंदीमुळे इच्छुक ग्राहकदेखील साईटवर किंवा कार्यालयांपर्यंत पोहोचू शकले नाहीत.
नाशिक : कोरोनाचा प्रभाव जगभरातील प्रत्येक उद्योग व्यवसायावर पडत असून नाशिकच्या बांधकाम व्यवसायाला गत काही काळापासून असलेल्या मरगळीला कोरोनाच्या प्रभावाने अजूनच स्लो डाऊनचा धक्का सहन करावा लागणार आहे. मात्र, काही काळानंतर पुन्हा परिस्थिती पूर्व पदावर येईल, असा विश्वासदेखील नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
बांधकाम क्षेत्रासाठी यंदाचा गुढीपाडवा पुन्हा कधीच उगवू नये, असाच ठरला. संचारबंदीमुळे इच्छुक ग्राहकदेखील साईटवर किंवा कार्यालयांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांशी साधलेल्या संवादात मजूरांचे स्थलांतर, बांधकामांना काहीसा विलंब यासह अन्य काही अडथळे येणार असले तरी बांधकाम क्षेत्र स्थिरस्थावर होण्यासाठी काही कालावधी लागणार असला तरी त्यातून नाशिकचे बांधकाम क्षेत्र पुन्हा बहरेल, असेही त्यांनी नमूद केले.
---
प्रकल्प विलंबाबत विचार व्हावा
सद्यस्थितीत लोकांना जीवाचीच भीती असल्याने मजूर पूर्वीच आपापल्या गावी स्थलांतरीत झाले आहेत. त्या मजूरांना पुन्हा कामावर आणणे, विस्कटलेली घडी पुन्हा स्थिरस्थावर करणे यासाठी काही काळ लागणारच आहे. त्यामुळे शासनाने भविष्यात रेरामध्ये नोंद झालेल्या प्रकल्पांच्या विलंबासाठी डेट वाढवून द्यावी. तसेच कोरोनाचा बीमोड झाल्यानंतर काही विशेष पॅकेजदेखील द्यावा लागेल. एकूणातच सर्वच अर्थव्यवस्थेला हादरा बसणार असल्याने शासनाला त्याबाबत गांभिर्याने विचार करावा लागेल.
- नरेश कारडा, कारडा कन्स्ट्रक्शन
नोंदणी नसलेल्या मजूरांनाही मदत मिळावी
या व्यवसायात मजूर प्रामुख्याने युपी, बिहार, मराठवाडा आणि विदर्भातील असून सध्याच्या स्थितीत बहुतांश मजूर गावी परतले आहेत. नोंदणीकृत मजूरांना शासन मदत करणार असले तरी ज्या मजूरांची नोंदणी झालेली नाही, त्यांनादेखील शासनाने मदत दिल्यास ते सध्याच्या परिस्थितीशी मुकाबला करु शकतील. कोरोनामुळे बांधकाम प्रकल्पांना विलंब तसेच त्यामुळे कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढण्याची शक्यता आहे. किती काळ त्यातून बाहेर पडायला लागेल, ते अनिश्चित असले तरी त्यातून बाहेर पडू असा विश्वास वाटतो.
- रवी महाजन, रवी महाजन बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स
परिस्थिती अधिक ढासळू नये
या व्यवसायावर अवलंबून असलेल्या किमान ५० निरनिराळ्या व्यावसायिक आणि प्रचंड प्रमाणातील मजूरांना या सर्व स्थितीचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे शासनाने सर्वप्रथम या सामान्यांची काळजी आणि सुरक्षितता यांना प्राधान्य द्यावे. समाजातील प्रत्येक घटकाचाच शासनाला विचार करावा लागणार असून परिस्थिती काही काळानंतर निश्चितपणे पूर्वपदावर येईल. त्यानंतर बांधकाम क्षेत्राची स्थिती अधिक ढासळू नये, अशा उपाययोजना शासनाने कराव्यात.
- दीपक चंदे, दीपक बिल्डर्स
सध्याची स्थिती तात्पुरती
जगातील प्रत्येक क्षेत्रावरच या स्थितीचा परिणाम होणार आहे. मात्र, ही परिस्थिती केवळ तात्पुरत्या स्वरुपातील आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायाची गती काहीशी मंदावेल. परंतु, त्याचा प्रदीर्घ काळ परिणाम होणार नाही. ज्यांचे व्यवहार चांगले असतील, ज्यांचे काम चांगले असेल अशा कंपन्याच या स्थितीतून लवकर सावरु शकतील. थोडाफार जो परिणाम होईल, त्याबाबत शासनदेखील भविष्यात मदत करेल.
- निखिल रुंगटा, रुंगटा ग्रुप