नाशिकचे सांस्कृतिक चैतन्य लोपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:10 AM2020-12-07T04:10:00+5:302020-12-07T04:10:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : चेहऱ्यावर सदैव विलसणाऱ्या स्मितहास्यासह नाशिकच्या बहुतांश सांस्कृतिक उपक्रमांमधील चैतन्यच जणू लोपले असल्याची भावना कुसुमाग्रज ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : चेहऱ्यावर सदैव विलसणाऱ्या स्मितहास्यासह नाशिकच्या बहुतांश सांस्कृतिक उपक्रमांमधील चैतन्यच जणू लोपले असल्याची भावना कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या ज्येष्ठ तबलावादक नवीन तांबट यांच्या शोकसभेत व्यक्त करण्यात आली.
पेठे हायस्कूलचे सेवानिवृत्त कलाशिक्षक आणि तबलावादक नवीन तांबट यांचे शुक्रवारी (दि.४) निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर कुसुमाग्रज स्मारकात या शोकसभेचे आयोजन करण्यात आले हाेते. यावेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने माजी आमदार हेमंत टकले यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तांबट यांच्या निधनाने जणू नाशिकचा तबला मुका झाल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकच्या अनेक सांस्कृतिक, सामाजिक संस्थांमध्ये असलेला त्यांचा वावर हा तिथे काहीतरी देण्यासाठी असायचा. अशी माणसे सदैव समाजाला काही ना काही देत राहतात. अगदी अजातशत्रू आणि साधुत्व असलेला माणूस आपल्यातून निघून गेल्याचे दु:ख नाशिकच्या समस्त कलाप्रेमींना झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले. नानासाहेब बोरस्ते यांनी सावानाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करून तांबट हे स्वत: एक चालतेबोलते सांस्कृतिक केंद्र असल्याची भावना व्यक्त केली. जयप्रकाश जातेगावकर यांनी अत्यंत उत्तम कलागुण असलेला आणि कलाकारांच्या सर्व वर्तुळांमध्ये वावर असलेला कलाप्रेमी हरपल्याची भावना व्यक्त केली. अत्यंत चैतन्यदायी आणि लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना हवहवेसे वाटणारे तांबट सर गेल्याने सर्वांनाच अतीव दु:ख झाल्याचे सांगितले. मकरंद हिंगणे यांनी नाशिकच्या सर्व सामाजिक संस्थांचा हक्काचा आपला माणूस आणि आमच्या प्रकाशयात्रेतील प्रकाश हरपल्याची खंत व्यक्त केली. गायन, नाट्यस्पर्धांमधून विद्यार्थ्यांना सदैव प्रोत्साहन देणारा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा हा कलावंत हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी रमेश देशमुख, दिलीप साळवेकर, विनायक रानडे, देवदत्त जोशी, राजेंद्र निकम, रोहिणी पांडे यांनी शोकभावना व्यक्त केल्या.