नाशिकचा देबजित राय राष्ट्रीय नेमबाजी संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 08:30 PM2020-02-27T20:30:06+5:302020-02-27T20:31:58+5:30
नाशिकचा नेमबाज देबजित राय याने राष्ट्रीय संघात स्थान मिळवून देदीप्यमान यश संपादन केले आहे. शाळेत शिकतानाच नेमबाजीचा नियमित सराव करीत देबजितने हे यश संपादन केले असून विशेष म्हणजे दहावीच्या परीक्षेची तयारी करतानाही त्याने त्याचा सराव नियमित सुरू ठेवला होता..
नाशिक : शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमधून विविध खेळांमध्ये राष्ट्रीय व आंतररराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडत असून याच शृंखलेत नाशिकचा नेमबाज देबजित राय याने राष्ट्रीय संघात स्थान मिळवून देदीप्यमान यश संपादन केल्याची माहिती अशोका ग्रूप आॅफ स्कूलचे सहसचीव श्रीकांत शुक्ल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक आस्था कटारीया, अमिताभ गर्ग, दिनेश सबनीस आदी उपस्थित होते.
अशोका स्कूलमधील दहावीतील विद्यार्थी देबाजीत रॉय याने भारतीय संघात स्थान पटकाविले आहे. शाळेत शिकत असताना त्याची शुटिंगची आवड लक्षात घेऊन शाळेतील प्रशिक्षक अभय कांबळे यांनी त्याला प्रोत्साहन दिले. त्यामुळे २०१५ मध्ये देबजीतने पहिल्यांदाच जिल्हापातळीवरील एअर रायफल स्पर्धा जिंकत कांस्यपदक पटकाविले होते. त्यानंतर २०१६ साली झालेल्या स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळविले. त्यानंतर पुणे येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत निवड झाली. यानंतरच्या जिल्ह्यापातळीवरच्या व राज्य पातळीवरच्या विविध स्पर्धांतून देबाजीतने सातत्याने सुवर्ण, रजत पदक मिळवित यश संपादन केले. केरळ येथे झालेल्या ६१ व्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर त्यांची भारतीय संघात प्रवेश केला आहे. देबजितने नवी दिल्ली येथे झालेल्या‘खेलो इंडिया खेलो’ स्पर्धेसह कोल्हापूर, दिल्ली, मुंबई, केरळ येथे पार पडलेल्या विविध स्पर्धातुन स्वत:ला सिद्ध करीत जानेवारी २०२० मध्ये केरळ येथे झालेल्या स्पर्धेत सहभागी होत केलेल्या कामिरीमुळे भारतीय संघातील युवा श्रेणीत त्याने स्थान मिळविले आहे. या संघाचे सराव शिबिर येत्या १ एप्रिल २०२० पासून नवी दिल्ली येथे सुरु होणार आहे.