नाशिकची पाेरं हुश्शार; प्राधान्य ऑनलाईन लर्निंग लायसन्सच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:10 AM2021-07-05T04:10:26+5:302021-07-05T04:10:26+5:30
नाशिक: कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन शासनाने लर्निंग लायसन्स काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत ...
नाशिक: कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन शासनाने लर्निंग लायसन्स काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत असल्या तरी नाशिककर तरुणांकडून ऑनलाईनलाच प्राधान्य दिले जात आहे. यामुळे नाशिक प्रादेशिक कार्यालयात नेहमी होणारी वर्दळ कमी झाली आहे.
ऑनलाईन लर्निंग लायसन्स काढण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने इतर जिल्ह्यांमधील या व्यवस्थेला काहीसा ब्रेक लागल्याचे दिसते. त्यामुळे प्रादेशिक कार्यालयांमध्ये पुन्हा गर्दी होऊ लागलेली आहे. नाशिक येथील प्रादेशिक कार्यालय मात्र त्यास अपवाद ठरत आहे. लर्निंग लायसन्स काढण्यासाठी दरवेळी होणारी गर्दी आता कमी झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर आल्याने सर्वत्र खबरदारी घेण्यात येत असल्याने प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन गर्दी करण्यापेक्षा ऑनलाईन अर्ज भरण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसते. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयात न जाता ऑनलाईन अर्ज करण्याकडे कल असल्याचे दिसून येते. वास्तविक ऑनलाईन अर्ज करणे सेापे असून यामुळे होणारी आर्थिक लूटही टळणार असल्याने ऑनलाईन अर्ज करण्याकडे कल वाढला असल्याचे दिसून येते. १४ जूनपासून सुरू झालेल्या ऑनलाईन अर्ज करण्याच्या पहिल्याच टप्प्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने दुसऱ्या आठवड्यापासून परिवहन कार्यालायांमधील गर्दी कायम होती. नाशिक मात्र त्यास अपवाद ठरले आहे.
--इन्फो--
ऑनलाईनसाठी काय अडचणी येतात?
१) सर्व्हरची सर्वात मोठी समस्या निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मोबाईलवरून ऑनलाईन परीक्षा देताना तांत्रिक अडचण उद्भवत आहे.
२) मोबाईलवरून परीक्षा देताना मेाबाईलच्यादेखील अडचणी येतात. काहींना तर प्रश्नदेखील समजत नसल्याने परीक्षा देताना अडचणी येतात.
३) तांत्रिक अडचणीमुळे पुन्हा लॉगिन होईलच असे शक्य होत नाही. त्यामुळे सर्व्हरची वाट पाहत बसावे लागते. निर्बंधामुळे तर वेळेचीही अडचण येत आहे.
--इन्फो--
परीक्षेतील गोंधळातील प्रकार नाशिमध्ये कमीच
ऑनलाईन परीक्षेत ३० सेकंदामध्ये उत्तराचा ऑप्शन द्यावा लागतो. अशावेळी प्रश्न नीट समजला नाही किंवा उत्तर निवडेपर्यंत वेळ निघून जाते त्यामुळे नापास होण्याचा धोका वाढतो. अशावेळी डमी उमेदवार परीक्षा देत असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. त्यामुळे ऑनलाईन परीक्षेच्या विश्वासार्हतेचेही प्रश्न निर्माण झाला आहे. सुदैवाने नाशिमध्ये अशी कोणत्याही प्रकारची तक्रार समोर आलेली नाही.
--कोट--
ऑनलाईन लायसन्स काढताना कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार नाशिकमध्ये आढळून आलेला नाही. डमी उमेदवार बसविण्याचा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर तत्काळ फौजदारी कारवाई केली जाईल. कोरोनामुळे संसर्ग रोखण्यासाठी आरटीओ कार्यालयात सर्व शासकीय नियम पाळून काम केले जात आहे. ऑफलाईन लर्निंग लायसन्सला ऑनलाईन पर्याय असला तरी ऑफलाईन लर्निंग लायसन्सपेक्षा ऑनलाईन प्रक्रियेला उमेदवार पसंती देत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.- विनय अहिरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.
--इन्फो--
१,२०० लायसन्स ऑनलाईन
ऑनलाईन प्रक्रियेनुसार जवळपास १,२०० लायसन्स ऑनलाईन देण्यात आलेले आहे. लर्निंग लायसन्ससाठी १,६७३ जणांची चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये जवळपास १,३६९ उमेदवार उत्तीर्ण झाले असून ३०४ उमेदवार नापास झाले आहेत. ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने यामध्ये आणखी वाढ होणार आहे.
--इन्फो--
किती लायसन्स दिले?
२०१८-१९: ३०,०००
२०१९-२० : ३५,०००
२०२०-२१: १५,५००
मे २०२१ : ९५०
--कोट--
लायसन्स काढण्यासाठी तांत्रिक अडणी आहेत. कोणताही अर्ज भरायचे म्हटले तर यंत्रणेवर ताण येतो. लर्निंग लायसन्ससाठीदेखील सर्व्हरची अडचण येत असली तरी फारसा फरक पडत नाही. प्रत्यक्ष जायचेच नसल्याने जेव्हा यंत्रणा सुरळीत होते तेव्हा अर्ज भरता येतो. यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची गरज नाही. यातून एजंटांकडून होणारी लूटही टळणार आहे.
- प्रसाद येवले, लायन्सधारक
ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी सुविधा असल्याने घरबसल्या अर्ज करणे कधीही चांगले. उगाचच गर्दी करण्यातही अर्थ नाही. शासनाने काहीतरी परिस्थिती बघूनच निर्णय घेतलेला असल्याने ऑनलाईन सुविधेचा लाभ घेत अर्ज सादर केला आहे. आठ दिवसात प्रक्रिया पूर्ण होईल, असे सायबर कॅफेकडून सांगण्यात आले.
- अतिष जामखेडकर