नाशिकचा गणेशोत्सव पर्यावरण उत्सव ठरावा; प्राचार्य किशोर पवार यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 12:23 AM2019-09-08T00:23:47+5:302019-09-08T00:26:21+5:30
नाशिक- अत्यंत मंगलमय वातावरणात, सुरक्षाविषयक सर्व प्रकारची काळजी घेत ध्वनी प्रदूषणविषयक सर्व कायदे काटेकोरपणे पाळत आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे जलप्रदूषणाला पूर्णपणे रोखण्याच्या निर्धाराने यंदाचा गणेश विसर्जन सोहळा व्हावा, हीच आजच्या काळाची गरज आहे, असे मत पर्यावरण क्षेत्रातील जाणकार प्रा. डॉ. किशोर पवार यांनी व्यक्त केले. गणेशोत्सव हा खऱ्या अर्थाने पर्यावरण उत्सव व्हायला हवा असेही ते म्हणाले.
नाशिक- अत्यंत मंगलमय वातावरणात, सुरक्षाविषयक सर्व प्रकारची काळजी घेत ध्वनी प्रदूषणविषयक सर्व कायदे काटेकोरपणे पाळत आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे जलप्रदूषणाला पूर्णपणे रोखण्याच्या निर्धाराने यंदाचा गणेश विसर्जन सोहळा व्हावा, हीच आजच्या काळाची गरज आहे, असे मत पर्यावरण क्षेत्रातील जाणकार प्रा. डॉ. किशोर पवार यांनी व्यक्त केले. गणेशोत्सव हा खऱ्या अर्थाने पर्यावरण उत्सव व्हायला हवा असेही ते म्हणाले.
प्रश्न: गणेश विसर्जन काळात कोणत्या बाबींवर भर द्यायला हवा?
पवार: गणेशोत्सव विसर्जन काळात प्लॅस्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती, तसेच मोठ्या आकाराच्या मूर्तींमुळे विसर्जनाच्या वेळी होणारे पाण्याचे प्रदूषण जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण करणारे असते. त्यामुळे मुळात अशा मूर्ती आणूच नये आणि आणलेल्या असल्यास किमान त्यांचे विसर्जन करू नये. त्याऐवजी प्रातिनिधिक स्वरूपातील शाडू मातीच्या छोट्या मूर्तींचे विसर्जन करावे. तसेच सजावटीसाठी विघटनशील नसलेल्या कोणत्याही घटकाचा वापर केलेला असल्यास त्या साहित्याचेदेखील विसर्जन नदी, विहीर किंवा नैसर्गिक तलावात करू नये. त्याऐवजी आता प्रशासनाकडून दिला जाणारा कृत्रिम तलाव हाच सर्वोत्तम पर्याय आहे.
प्रश्न: जलप्रदूषणाशिवाय अन्य कोणत्या प्रदूषणाबाबत विशेष काळजी घ्यायला हवी?
पवार: गणेश विसर्जन केल्यावर गणपतीच्या मूर्तीची आणि निर्माल्याची होणारी दशा अत्यंत विदारक असते. वाढते प्रदूषण, जागतिक तापमानवाढ आणि वाढते नदी प्रदूषण व त्याचे होणारे परिणाम या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा ध्यास प्रत्येकाने घ्यायला हवा. गणेशोत्सवाच्या काळात ध्वनीप्रदूषणदेखील मोठ्या प्रमाणावर होते. ध्वनिप्रदूषण थांबवण्यासाठी ढोल-ताशा पथक व स्पीकरवर पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. ध्वनिक्षेपक आणि डॉल्बीसारख्या मोठ्या आवाजातील वाद्यांमुळे होणाºया ध्वनीप्रदूषणाने मानवी आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असतात. हे प्रत्येकाने लक्षात घेऊन ध्वनिप्रदूषणाबाबतही अत्यंत सजग बनण्याची गरज आहे.
प्रश्न: पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी काय करणे आवश्यक आहे?
पवार: गणेशोत्सव घरगुती आणि सार्वजनिक स्वरूपात साजरा करीत असताना तो पर्यावरणपूरक आणि पर्यावरण अनुकूल कसा होईल, या विचाराला प्राधान्य द्यायला हवे. या कालावधीत पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाची काळजी घेतली जाईल, हे पाहणे आपल्या सर्वांचे नैतिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे समजून आपण त्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. गणेशोत्सव आणि विसर्जन काळात आपण करीत असलेली कोणतीही कृती ही पर्यावरणाला बाधा आणणारी नाही ना? एवढा विचार प्रत्येक मंडळाने आणि सामान्य नागरिकांनी केला तरी बहुतांश समस्या सुटू शकेल, असे मला वाटते.
मुलाखत: धनंजय रिसोडकर