सिंहस्थ आराखडा पोहचला अकरा हजार कोटींवर; कामे अंतिम टप्प्यात
By Suyog.joshi | Published: December 13, 2023 10:22 AM2023-12-13T10:22:47+5:302023-12-13T10:23:06+5:30
विकासकामांची जंत्री पाहता सिंहस्थ आराखडा अकरा हजार कोटींवर गेला.
नाशिक - महापालिकेकडून आगामी सिंहस्थ कुंभमेळा विकासकामे आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून खर्चाचा आकडा अकरा हजार कोटींवर पोहचला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विविध विकासकामांसाठी भूसंपादनासाठीच चार ते पाच हजार कोटींची आवश्यकता आहे.
अतिरिक्त आयुक्त प्रदिप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.१२) सर्व विभागप्रमुखांची आराखडा तयारी बाबत आढावा बैठक झाली.
सिंहस्थ कुंभमेळा नाशिकच्या विकासासाठी पर्वणी ठरतो.बारावर्षांचा शहराच्या विकासाचा बॅकलाॅग भरुन काढतो. सन २०२७- २८ मध्ये कुंभमेळा होणार असून तयारीसाठी अवघे तीन वर्ष उरले आहे.पण मंत्रालय स्तरावरुन अद्याप तयारीबाबत उदासीनता दिसते. पण दुसरीकडे मनपा आयुक्तांच्या सूचनेनंतर सर्व विभागांनी स्वत:च्ता स्तरावर कुंभमेळा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
पहिल्या टप्प्यात हा आराखडा आठ हजार कोटींच्या घरात होता. पण अंतर्गत रिंगरोड, मिसिंग लिंक, जुन्या रिंगरोडचे रुदिकरण यासाठी भूसंपादन करावे लागणार असून त्यासाठी तीन हजार कोटींची गरज आहे. विकासकामांची जंत्री पाहता सिंहस्थ आराखडा अकरा हजार कोटींवर गेला. अतिरिक्त आयुक्तांनी सर्व विभागांना आराखड्यात कोणत्याही त्रुटी रहायला नको अशा सूचना दिल्या आहेत. लवकरच हा आराखडा आयुक्तांना सादर केला जाईल.