नाशिकच्या साहित्यक्षेत्रातील निखळ विनोद लोपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:17 AM2021-08-23T04:17:35+5:302021-08-23T04:17:35+5:30
नाशिक : तब्बल चार दशकांहून अधिक काळापासून साहित्य क्षेत्रात मुसाफिरी करणारे आणि शतकापेक्षाही अधिक साहित्यसंपदेचे धनी असलेले आणि अखेरच्या ...
नाशिक : तब्बल चार दशकांहून अधिक काळापासून साहित्य क्षेत्रात मुसाफिरी करणारे आणि शतकापेक्षाही अधिक साहित्यसंपदेचे धनी असलेले आणि अखेरच्या वर्षातही कार्यमग्न असलेले ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत उर्फ दादा महामिने यांच्या निधनाने नाशिकच्या साहित्यक्षेत्रातील निखळ विनोदाचा अखंड झरा लोपल्याची भावना नाशिकच्या साहित्य वर्तुळात व्यक्त करण्यात आली.
विलक्षण ग्रामीण बाजाची स्वतंत्र लेखनशैली विकसित केलेले, खुसखुशीत शैलीत हमखास हंशा वसूल करणारे विनोदी लेखन करणारे लेखक म्हणून दादा सर्वज्ञात होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने विनोदी लेखनाचा अखंड झरा असलेला साहित्यिक लोपल्याची भावना साहित्यिकांसह मान्यवरांनी व्यक्त केली.
ही वार्ता ऐकून अतीव दु:ख झाले. त्यांचा आणि माझा स्नेह हा गत ४५ वर्षांपासूनचा होता. आम्ही दोघेही तेव्हापासूनच सावानाच्या जिल्हा मेळाव्याचे यात्रेकरू होतो. त्यांचे खुसखुशीत शैलीतील लेखन आणि भाष्य माझ्यासह सर्व रसिकांना नेहमीच आवडायचे. आमच्या अनुष्टुभ परिवाराशी निगडीत असल्याने आणि एकमेकांचे स्वभाव जुळल्याने आमचा एकमेकांशी विशेष स्नेह होता. दादांना माझ्यासह परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
गो. तु. पाटील, ज्येष्ठ साहित्यिक
आपल्या विनोदी लेखनाने खळखळून हसविणारे चंद्रकांतदादा महामिने यांनी त्यांच्या लेखणीने रसिकांना भरभरून आनंद दिला. प्रवराकाठच्या माणसाने गोदावरी काठी आपली सर्व लेखणी लोकांचे रंजन करण्यासाठी, प्रबोधन करण्यासाठी झिजवली आणि ते आपल्यातून गेले. वाचनालयाने त्यांना साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्षपद आणि साहित्य पुरस्कार देऊन गौरविले होते.
प्रा. शंकर बोऱ्हाडे, साहित्यिक
नाशिकमध्ये विनोदी साहित्याचा प्रवाह अखंड जिवंत ठेवण्यात चंद्रकांतदादांचे सर्वांत मोठे योगदान होते. सातत्याने लिखाण सुरू ठेवतानाच नाशिकमधील प्रत्येक रसिकाशी त्यांचे स्नेहसंबंध जुळून आलेले होते. राज्य शासनाच्या पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने निखळ विनोदी शैलीत नाशिककरांशी स्नेहबंध निर्माण करणारा साहित्यिक हरपला आहे.
प्रा. वेदश्री थिगळे, साहित्यिक
महामिने दादांनी विनोदी लेखनाची विलक्षण ग्रामीण बाजाची ढंगदार लेखन परंपरा या काळात निर्माण केली. विनोदी दिवाळी अंकाचे प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे महामिने दादांच्या धमाल कथा होत्या. त्यांच्या कथेतील इरसाल कॅरेक्टर्स, आपल्या भोवतालच्या आपल्याला सहज वाटणाऱ्या घटनांची धमाल विनोदी पद्धतीनं मांडणी यांनी मराठी विनोदाला वेगळं परिमाण दिले होते.
दत्ता पाटील, साहित्यिक
साहित्य वर्तुळातील सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवत दादांनी विपुल लेखन केले. शंभरहून अधिक पुस्तके प्रकाशित होऊनही त्यांच्या लेखनातील प्रयोगशीलता वाखण्याजोगी होती. प्रतिकूल परिस्थितीत जन्मलेले दादा मराठी साहित्यातील नामवंत लेखकांच्या मांदियाळीत त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. सावानासह समस्त रसिकांच्या वतीने दादांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
जयप्रकाश जातेगावकर, प्रमुख सचिव, सावाना