नाशिकची मदार वाढीव व्हेंटिलेटरवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 11:27 PM2020-07-01T23:27:25+5:302020-07-02T00:28:58+5:30
शहराची लोकसंख्या २० लाख, जिल्ह्याची लोकसंख्या ६२ लाख, आतापर्यंतच्या बाधितांचा एकूण आकडा चार हजारांच्या घरात, त्यात सध्या उपचार घेत असलेले एकूण रुग्ण १५००हून अधिक, तर नाशिक जिल्ह्यामधील एकूण व्हेंटिलेटर्सची संख्या अवघी २३५ आहे. कोरोनाच्या दहशतीला तीन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही प्रशासनाला व्हेंटिलेटर्सच्या संख्येमध्ये फारशी वाढ करता आलेली नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्याची मदार अजून मागविलेल्या ३० व्हेंटिलेटरवरच आहे.
नाशिक : शहराची लोकसंख्या २० लाख, जिल्ह्याची लोकसंख्या ६२ लाख, आतापर्यंतच्या बाधितांचा एकूण आकडा चार हजारांच्या घरात, त्यात सध्या उपचार घेत असलेले एकूण रुग्ण १५००हून अधिक, तर नाशिक जिल्ह्यामधील एकूण व्हेंटिलेटर्सची संख्या अवघी २३५ आहे. कोरोनाच्या दहशतीला तीन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही प्रशासनाला व्हेंटिलेटर्सच्या संख्येमध्ये फारशी वाढ करता आलेली नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्याची मदार अजून मागविलेल्या ३० व्हेंटिलेटरवरच आहे.
नाशिकमधील बाधितांच्या आकड्याच्या दृष्टीने जुलै आणि आॅगस्ट हे दोन महिने कोरोनाच्या दृष्टीने जिल्ह्यासाठी सर्वाधिक घातक ठरण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. नजीकच्या भविष्यात ही व्हेंटिलेटर्स अपुरी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरातील वाढती रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्या हा जिल्ह्यातील सर्वाधिक महत्त्वाचा विषय ठरत आहे. नाशिकमध्ये आरोग्य यंत्रणाच संभ्रमित झाले असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाग्रस्त नाशिकच्या पार्श्वभूमीवर ३१ हजार ७९४ नाशिककरांमागे केवळ एकच व्हेंटिलेटर सध्या नाशकात उपलब्ध आहे. परंतु, सध्या व्हेंटिलेटरची आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांना पुरेसे व्हेंटिलेटर असल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, रुग्णांची संख्या वाढत असून, अधिकच उद्रेक वाढल्यास आपण या महामारीचा सामना करण्यास कितपत सज्ज आहोत, हे सांगण्यास यंत्रणादेखील हतबल आहे. शहरातील आरोग्य यंत्रणांना तोकड्या साधनांमध्ये कोरोनाचा सामना करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने मागविलेले ३० व्हेंटिलेटर त्यांना उपलब्ध झालेले नाहीत.
महापालिकेला मिळाले केवळ ३६ व्हेंटिलेटर
जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर वाढविण्याचे प्रयत्न झाल्यानंतर ही संख्या जिल्ह्यात ८५ वर पोहोचली आहे. नाशिक महापालिकेला शुक्रवारी ३६ व्हेंटिलेटर उपलब्ध झाली आहेत. जिल्हा रुग्णालयासह मनपांची सर्व रुग्णालये मिळून एवढेच व्हेंटिलेटर आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये असलेले सुमारे १५० व्हेंटिलेटर हेच शासकीय यंत्रणेसाठी काहीसा आधार ठरू शकणार आहेत.