नाशिकचे मराठी साहित्य संमेलन अखेर लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 01:50 AM2021-03-08T01:50:27+5:302021-03-08T01:50:56+5:30
नाशिक येथे २६ ते २८ मार्च या कालावधीत होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी यासंदर्भातील घोषणा औरंगाबाद येथे केली. संमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले असले, तरी कोरोनाचा प्रसार कमी होताच त्यापुढील २० दिवसांत संमेलन घेण्याची तयारी असल्याचे साहित्य संमेलन पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.
नाशिक / औरंगाबाद : नाशिक येथे २६ ते २८ मार्च या कालावधीत होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी यासंदर्भातील घोषणा औरंगाबाद येथे केली. संमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले असले, तरी कोरोनाचा प्रसार कमी होताच त्यापुढील २० दिवसांत संमेलन घेण्याची तयारी असल्याचे साहित्य संमेलन पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.
कोरोनाच्या आपत्तीवर नियंत्रण नसल्यासारखीच स्थिती आहे. त्यामुळे कोरोना ओसरल्यावर स्वागत मंडळाला साहित्य महामंडळाशी चर्चा करून संमेलन कधी घ्यायचे, त्याबाबत निर्णय घेता येईल, असे ठाले-पाटील यांनी नमूद केले. संमेलन तात्पुरते रद्द करताना शासन तसेच सर्व घटकांचा विचार करूनच निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे तर, नाशिकसाठीच्या संमेलनाची पूर्वतयारी जोरात सुरू असतानाच सर्वांच्या सुरक्षिततेकरिता हा निर्णय घ्यावा लागला, असे कार्याध्यक्ष हेमंत टकले यांनी सांगितले.
...तर मे महिन्यात संमेलन
स्थगित संमेलनाचे अध्यक्ष, मावळते अध्यक्ष आणि सर्व निमंत्रित साहित्यिक यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, असेही ठाले-पाटील यांनी स्पष्ट केले आहे तसेच कोरोना आटोक्यात आल्यानंतर, मे, २०२१ पर्यंत नाशिकला संमेलन घेण्याची अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली आहे.
विद्रोही साहित्य संमेलनही रद्द
नाशिकमध्ये केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात २५ व २६ मार्चला आयोजित करण्यात आलेले १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनदेखील रद्द करण्यात आले आहे. ज्या काळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होईल, त्याच दिवसांमध्ये विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा निर्णयदेखील रविवारी (दि.७) बैठकीत घेण्यात आला.