नाशिकचा पारा ४०.3 : दोन दिवस उष्णतेची लाट राहणार
By Admin | Published: March 27, 2017 06:07 PM2017-03-27T18:07:49+5:302017-03-27T18:21:17+5:30
सोमवारी तपमानाने चाळीशी ओलांडली असून ४०.३ इतक्या कमाल तपमानाची नोंद झाली.
नाशिक : शहराच्या कमाल तपमानात सातत्याने वाढ होत असून तपमानाचा पारा चाळीशीच्या पुढे सरकू लागल्याने नाशिककरांना ऊन्हाचा तीव्र चटका जाणवत आहे. सोमवारी तपमानाने चाळीशी ओलांडली असून ४०.३ इतक्या कमाल तपमानाची नोंद झाली. अजून दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
हंगामातील सर्वाधिक कमाल तपमान रविवारी ४०.१ अंश इतके नोंदविले गेले होते. त्यानंतर तपमानाचा पारा पुन्हा खाली घसरेल असे वाटत असताना सोमवारीही तपमानाचा पारा चढताच राहिला. तपमानाने चाळीशी ओलांडली असून ४०.३ इतक्या तपमानाची नोंद सोमवारी झाली. वाढत्या तपमानामुळे नागरिकांना तीव्र उन्हाचा चटका बसत असून दिवसेंदीवस वाढणाऱ्या तपमानामुळे थंड हवेचे शहर म्हणून नावलौकिक असलेल्या नाशिकमध्येही नागरिकांना उष्म्याचा त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारपर्यंत तपमानाचा पारा ३८ ्रअंशावर स्थिरावत होता; मात्र शुक्रवारपासून तपमानाचा पारा अधिकच चढू लागला असून चालीशी ओलांडली आहे. मागील वर्षापेक्षा अधिक तीव्र उन्हाळा नाशिककरांना यंदा अनुभवयास येत आहे. गेल्या वर्षी २५ मार्च रोजी ३९.७ इतक्या तपमानाची नोंद करण्यात आली होती. ही नोंद मार्च महिन्यामधील उच्चांक ठरली होती. मार्च महिन्यात गेल्या वर्षी ३९.७ अंशाच्या पुढे कमाल तपमानाचा पारा सरकला नव्हता मात्र यावर्षी मार्च महिन्यातच कमाल तपमानाने चाळीशी ओलांडल्याने नागरिकांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे.