राज्यात नाशिकचा पारा नीचांकी; गुलाबी थंडीचा अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 02:31 PM2020-11-07T14:31:28+5:302020-11-07T14:37:12+5:30
राज्यात सध्या नाशिककर व पुणेकरांना बोचऱ्या थंडीचा अनुभव येत आहे. शुक्रवारी संध्याकाळपासून वातावरणात थंडी वाढली होती. शनिवारी पहाटेसुध्दा नाशिकरांना थंडीमुळे उबदार कपड्यांचा वापर करावा लागल्याचे दिसून आले.
नाशिक : शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून नागरिकांना गुलाबी थंडीचा अनुभव येऊ लागला आहे. किमान तापमानाचा पाराही हळुहळु घसरु लागला आहे. १६ अंशावरुन पारा थेट शनिवारी (दि.७) १३ अंशापर्यंत खाली आला. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे.
गेल्या मंगळवारी शहराचे किमानत तापमान १६.४ अंशावर होते; मात्र मागील चार दिवसांत तापमानात वेगाने घट होऊ लागली आहे. तापमान थेट १३ अंशापर्यंत खाली आले आहे. शुक्रवारी १३.७ अंशावर असणारा पारा होता, परंतु शनिवारी पारा थेट १३ अंश इतका झाला. राज्यात सर्वाधिक कमी किमान तापमान शनिवारी नाशिकमध्ये नोंदविले गेले. महाबळेश्वरला सुध्दा १४.८ अंश तर पुणे शिवाजीनगर येथे १३.३ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले. राज्यात सध्या नाशिककर व पुणेकरांना बोचऱ्या थंडीचा अनुभव येत आहे. शुक्रवारी संध्याकाळपासून वातावरणात थंडी वाढली होती. शनिवारी पहाटेसुध्दा नाशिकरांना थंडीमुळे उबदार कपड्यांचा वापर करावा लागल्याचे दिसून आले. शहरात आता उबदार कपड्यांना मागणी वाढू लागली आहे.