नाशिकच्या ‘मविप्र’ची पवार व्याख्यानमाला : वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीसाठा आटतोय - होलानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:33 PM2018-01-29T22:33:45+5:302018-01-29T22:36:33+5:30
मविप्रच्या वतीने तीन दिवसीय डॉ. वसंतराव पवार व्याख्यानमालेचे आयोजन रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आले. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प होलानी यांनी ‘पाणी एक लढा’ या विषयावर गुंफले.
नाशिक : पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, आशिया-आफ्रिका खंडामधील देशांपुढे भविष्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे. कारण वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मानवी उपयोगासाठी लागणारी पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी असून, लोकसंख्येच्या वाढत्या भस्मासुरामुळे पाणीसाठा संपुष्टात येऊ लागला आहे. त्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्य जीवन प्राधिकरणाचे माजी सचिव सदस्य व पाणी विषयाचे अभ्यासक राजेंद्र होलानी यांनी केले.
मविप्रच्या वतीने तीन दिवसीय डॉ. वसंतराव पवार व्याख्यानमालेचे आयोजन रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आले. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प होलानी यांनी ‘पाणी एक लढा’ या विषयावर गुंफले. जागतिक स्तरावर निर्माण होणारी पाण्याशी संबंधित समस्या, त्यामागील कारणे आणि उपाययोजना यावर त्यांनी चर्चा केली. पृथ्वीवरील एकूण पाणीसाठ्यापैकी मानवी जीवनसृष्टीसाठी वापराण्याजोगे असलेला पाणीसाठा आणि लोकसंख्या याबाबत विविध आलेखांच्या माध्यमातून होलानी यांनी उपस्थितांसमोर निरीक्षणे नोंदविली. व्याख्यानमालेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, नाना महाले, डॉ. तुषार शेवाळे, माणिकराव बोरस्ते, डॉ. सुनील ढिकले, भाऊसाहेब खताळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना होलानी म्हणाले, कमीत-कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त पिके कशी घेता येतील त्याचप्रमाणे पाण्याचा कमी वापर केल्यास शेतीचीही उत्पादन सुधारण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी १९६२ साली भारतामध्ये तीन हजार क्युबिक लिटर प्रतिव्यक्ती पाणी उपलब्ध होत होते; मात्र ते २०१४ साली केवळ एक हजार १४५ क्युबिक लिटर प्रतिव्यक्ती इतके कमी झाले. एकूणच वाढत्या लोकसंख्या आणि पाण्याचे ढिसाळ व्यवस्थापनामुळे पाणीसाठा अपुरा पडू लागला असल्याचा निष्कर्ष त्यांनी यावेळी सांगितला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. डी. पी. पवार यांनी केले व आभार प्रा. योगेशकुमार होले यांनी मानले.