‘बिबट्यांचे शहर’ अशी बनतेय नाशिकची नवी ओळख...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:13 AM2021-04-19T04:13:33+5:302021-04-19T04:13:33+5:30
अझहर शेख नाशिक : नाशिककरांना ‘बिबट्या’ हा तसा आता नवीन राहिलेला नाही. मागील तीन वर्षांपासून बिबट्याची उन्हाळ्यात थेट शहराच्या ...
अझहर शेख
नाशिक : नाशिककरांना ‘बिबट्या’ हा तसा आता नवीन राहिलेला नाही. मागील तीन वर्षांपासून बिबट्याची उन्हाळ्यात थेट शहराच्या मध्यवस्तीत हजेरी जणू ठरलेलीच असल्याचे दिसते. गेल्या वर्षी मे महिन्यात बिबट्या कॉलेजरोड व इंदिरानगरच्या राजसारथी सोसायटीत आला होता. तसेच २०१९ साली दोनदा बिबट्याने सावरकरनगर गाठले होते. बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे नाशिकला ‘बिबट्यांचे शहर’ अशी नवी ओळख मिळू लागली आहे.
शहराभोवती गोदावरी, दारणाच्या खोऱ्यात तसेच गंगापूर डावा, उजवा कालव्याच्या परिसरातील झाडोऱ्यांमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार आढळून येतो. गोदाकाठालगतच्या नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये नेहमीच बिबट्याचे दर्शन, बिबट्याचा हल्ल्याच्या बातम्या कानी येतात. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शहरासह जिल्ह्यात सर्वत्र बिबट्यांची संख्या वाढली आहे.
नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये बिबट्यांचे प्रमाण अधिक वाढलेले दिसून येते. शहरालगतच्या गावांमध्ये मागील वर्षी लॉकडाऊन काळात बिबट्या-मानव संघर्ष उफाळून आला होता. नाशिक, इगतपुरी तालुक्यात मानवी हल्ल्यांच्या घटनांमध्ये एकूण सहा बळी गेले होते. यामध्ये पाच बालके आणि एका वृध्दाचा समावेश होता. यावर्षीही इगतपुरी तालुक्यात बिबट्याने मानवी हल्ला काही दिवसांपूर्वी केला होता. नाशिक हे जणू बिबट्यांचे माहेरघरच बनले आहे. नाशकात मागील वर्षी चाळीसपेक्षाही अधिक बिबट्यांचा मृत्यू विविध कारणांनी झाला होता.
--इन्फो--
लॉकडाऊनचा काळ अन् बिबट्यांचा धुमाकूळ
मागील वर्षी कोरोनाच्या लाटेमुळे राज्य व केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केले होते. या काळात मार्चपासून तर जून महिन्यापर्यंत बिबट्यांचा दारणाखोऱ्यातील गावांमध्ये धुमाकूळ सुरू होता. वनविभागाने युध्दपातळीवर प्रयत्न करत सुमारे ११ बिबटे पिंजऱ्यात जेरबंद केले होते. मानव-बिबट्याच्या हल्ल्यात दारणालगतच्या विविध गावांमध्ये एका वृध्दासह चार मुलांचा बळी गेला होता.
--इन्फो--
‘त्या’ घटनेची पुनरावृत्ती
गंगापूररोडवरील सावरकरनगर भागात २०१९ साली २५ जानेवारी आणि १७ फेब्रुवारी रोजी बिबट्याने एन्ट्री मारली होती. जानेवारीत आलेल्या बिबट्याने चौघांना जखमी केले होते. यामध्ये प्रसारमाध्यमांचे दोन प्रतिनिधी आणि एक लोकप्रतिनिधी व एका वन कर्मचाऱ्याचा समावेश होता. माध्यम प्रतिनिधी बिबट्याच्या हल्ल्यांतून बालंबाल बचावले होते. दुसऱ्यांदा आलेल्या बिबट्याने वनपाल रवींद्र सोनार यांना रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान गंभीररीत्या जखमी केले होते. गंगापूररोडवासीयांच्या या सालाच्या आठवणी रविवारच्या बिबट्याच्या एन्ट्रीने पुन्हा ताज्या झाल्या होत्या.
-----
‘लोकमत विशेष’चा लोगो व बिबट्याचा प्रातिनिधिक संग्रहित फोटो वापरावा...