नाशिकचा गुलाब दोन तासांत दिल्लीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 01:45 AM2021-01-04T01:45:50+5:302021-01-04T01:46:15+5:30
अवघ्या दोन तासांमध्ये नाशिकच्या गुलाबासह इतरही फुले दिल्ली, बंगलोर, हैदराबाद या शहरांमधील बाजारपेठेत पोहोचू लागली आहेत. जिल्ह्यातील फुले उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
नाशिक : अवघ्या दोन तासांमध्ये नाशिकच्या गुलाबासह इतरही फुले दिल्ली, बंगलोर, हैदराबाद या शहरांमधील बाजारपेठेत पोहोचू लागली आहेत. जिल्ह्यातील फुले उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
ओझर येथील विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू झाल्याने, त्याचा आता शेतकऱ्यांनाही फायदा होऊ लागला असून, प्रवासी विमानांमधूनच आता फुलांचीही वाहतूक होऊ लागली आहे. मागील एक महिन्यापासून ही सेवा सुरू झाली असून, नाशिकमध्ये प्रथमच हा उपक्रम राबविला जात आहे. दररोज दीड ते दोन टन विविध प्रकारची फुले दिल्ली, बंगलोर, हैदराबाद या शहरांमध्ये पाठविली जात आहेत. अवघ्या दोन तासांमध्ये नाशिकमधील फुले या शहरातील बाजारपेठांमध्ये पोहोचत असल्यामुळे फुले ताजी आणि टवटवीत राहातात. यामुळे तेथील बाजारात त्यांना चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. अवघ्या महिनाभरात शंभरहून अधिक पेट्या या शहरांमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. दर चांगला मिळत असल्याने, स्थानिक शेतकऱ्यांनाही विमानाने माल पाठविणे परवडत असून, माल पाठविण्याचे दरही आवाक्यात असल्याने, शेतकरी आपला माल विमानसेवेच्या माध्यमातून पाठवत आहेत. विशेषत: जानोरी, दिंडोरी येथील शेतकऱ्यांना त्याचा अधिक लाभ होत आहे.