नाशिकच्या संजीवनी, किसन, उपेंद्रची बाजी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:15 AM2021-09-03T04:15:51+5:302021-09-03T04:15:51+5:30
नाशिक : वरिष्ठ आणि यूथ गटाच्या महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेला गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला. लांब पल्ल्याच्या धावण्याच्या ...
नाशिक : वरिष्ठ आणि यूथ गटाच्या महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेला गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला. लांब पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतीत नाशिकने पुन्हा एकदा वर्चस्व राखले. नाशिकच्या संजीवनी जाधव, किसन तडवी, उपेंद्र बालियन यांनी आपापल्या गटात बाजी मारत सुवर्णपदक पटकावले. तर ॲथलेटिक्सच्या अन्य प्रकारांमध्ये मुंबई, सातारा पुणे, हिंगोलीच्या खेळाडूंनीही चमकदार कामगिरी नोंदवली.
महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन आणि नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्यावतीने नाशिकच्या मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलाच्या सिंथेटिक ट्रॅकवर झालेल्या स्पर्धेत लांब पल्ल्याच्या शर्यतीत महिला गटात १० हजार मीटर धावण्याच्या प्रकारात नाशिकची आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू संजीवनी जाधव हिने ३५;१९:३० मिनिटांमध्ये धाव पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले. नागपूरच्या प्राजक्ता गोडबोलेने दुसरे तर ठाण्याच्या प्रियांका पाईकरावने तिसरे स्थान मिळविले.
पुरुषांच्या १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत नाशिकचा आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडू किसान तडवीनेही ३१;४५:९० मिनिटांमध्ये ही रेस पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले. तर सातारच्या आदिनाथ भोसलेने किसनला चांगली लढत देत ३३:०७:४० मिनिटांमध्ये ही रेस पूर्ण करून दुसरा क्रमांक मिळविला. नाशिकच्या कांतीलाल कुंभाराने त्याखालोखाल चांगली कामगिरी करून ३४:१०:८० मिनिटांमध्ये ही रेस पूर्ण करत तिसरे स्थान पटकावले.
२३ वर्षे वयोगटात मुलांमध्ये नाशिकच्या उपेंद्र बलियनने त्याची धाव ३१:५४:२० मिनिटांमध्ये पूर्ण करून या गटात सुवर्णपदक पटकावले. या प्रकारात सातारच्या बाळू पुकाळेने ३२:२७:५० मिनिटांची वेळ घेत दुसरा क्रमांक तर नाशिकच्या नीरज यादवने ३३:३६:४० मिनिटांमध्ये रेस पूर्ण करून तिसरे स्थान मिळविले, अशी माहिती असोसिएशनचे सचिव सतीश उचील आणि नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि स्पर्धेचे प्रमुख हेमंत पांडे यांनी दिली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा सचिव सुनील तावरगिरी, वैद्यनाथ काळे, प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक समिती कार्यरत आहे.
इन्फो
विजेत्यांना राज्य संघात स्थान
पुरुषांच्या तिहेरी उडी प्रकारात मुंबई उपनगरच्या खेळाडूंनी संपूर्ण वर्चस्व राखत पहिल्या तीन क्रमांकांवर आपले नाव कोरले. यामध्ये जय शहा, कृष्णा सिंग आणि अनिलकुमार साहू यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले. २३ वर्षे मुलांमध्ये १०० मीटर धावणे या प्रकारात रायगडच्या आतिफ लिम्बाडेने प्रथम, सातारच्या कुशल मोहिते आणि अभिजित भोसले यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला. खुल्या गटात पुरुषांमध्ये १०० मीटर धावणे या प्रकारात ठाण्याच्या अक्षय खोतने पहिला, पुण्याच्या किरण भोसलेने दुसरा तर मुंबई शहरच्या हर्ष राणेने तिसरा क्रमांक मिळविला. महिलांच्या खुल्या गटात १०० मीटर धावणे या प्रकारात ठाण्याच्या दिंद्रा वल्लादारेसने पहिला, मुंबई शहरच्या भावेशा कोठारीने दुसरा तर ठाण्याच्या प्राची पावसकरने तिसरा क्रमांक मिळविला. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे पात्रता पूर्ण करणाऱ्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड केली जाणार आहे. हा निवड झालेला महाराष्ट्राचा संघ वारंगल येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होईल
फोटो
११३ आणि ११८ (निलेश तांबे)
०२ किसन तडवी