नाशिकच्या ज्येष्ठ रांगोळी चित्रकारावर महापालिकेची ‘बंदी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 03:51 PM2018-05-08T15:51:57+5:302018-05-08T15:51:57+5:30
आपल्या कलेवर निस्सीम प्रेम करत बेभानपणे तासन्तास उन्हाने तप्त झालेल्या डांबरी रस्त्यावर बसून रांगोळीचित्र रेखाटण्याची परंपरा चुंभळे यांनी अखंडितपणे सुरू ठेवली आहे.
नाशिक : विविध सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथीच्या औचित्यावर राष्टपुरुष अथवा कर्तबगार व्यक्तींच्या स्मृती जागविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून जुने नाशिकमधील ज्येष्ठ रांगोळी चित्रकार नारायण चुंभळे हे महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वारावर देव-देवता व राष्टपुरुषांची रांगोळी चित्रे रेखाटत आले आहेत; मात्र अचानकपणे महापालिक प्रशासनाने आडमुठेपणाचे धोरण घेतल्याने या कलावंताची घुसमट होत आहे. प्रशासनाच्या फतव्यामुळे स्वरमालेचा शुक्रतारा ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचे चित्र काढण्यापासूनही सोमवारी (दि.७) संध्याकाळी त्यांना सुरक्षारक्षकांनी रोखले.
आपल्या कलेवर निस्सीम प्रेम करत बेभानपणे तासन्तास उन्हाने तप्त झालेल्या डांबरी रस्त्यावर बसून रांगोळीचित्र रेखाटण्याची परंपरा चुंभळे यांनी अखंडितपणे सुरू ठेवली आहे. या कलावंताच्या कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे तर लांबच राहिले मात्र चक्क राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वारावर त्यांना रांगोळीचित्र रेखाटण्यास प्रशासनाने बंदी घातल्याने संताप व्यक्त होत आहे. महाशिवरात्रीनिमित्त त्यांनी काढलेल्या रांगोळीचित्रावरून टिप्पणी झाली होती. तेव्हापासून पालिकेच्या प्रवेशद्वारावर रांगोळी काढण्यास बंदी घातली गेल्याचे त्यांनी सांगितले. नेहमीप्रमाणे सोमवारी (दि.७)चुंभळे हे सायकलवरून संध्याकाळी शरणपूररोडवरील राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वारावर पोहचले. त्यांनी रांगोळी काढण्यास सुरुवात केली असता सुरक्षारक्षकांनी धाव घेत त्यांना थांबवून ‘साहेबांचा आदेश आहे, तुम्ही येथे रांगोळी काढू शकत नाही. तुम्हाला परवानगी नाही’ असे सुनावले. चुंभळे यांनी ज्येष्ठ गायक अरुण दाते यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे रांगोळी चित्र रेखाटत असल्याचा खुलासाही केला; मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांना न जुमानता ‘आदेश आहे, तुम्ही चित्र काढू शकत नाही’ असे पुन्हा बजावले.