नाशिकच्या शिवसैनिकांनी आरतीची पेलली जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 01:24 AM2018-11-25T01:24:37+5:302018-11-25T01:25:16+5:30
राममंदिराच्या उभारणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरयू तिरी केलेल्या महाआरतीची जबाबदारी नाशिकच्या शिवसैनिकांनी लीलया पेलली असून, सिंहस्थ कुंभमेळा व गोदावरीच्या महाआरतीचा पूर्वानुभव नाशिकच्या शिवसैनिकांना असल्यामुळेच देशात गाजलेल्या शिवसेनेची ‘चलो अयोध्या’ची घोषणा यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
नाशिक : राममंदिराच्या उभारणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरयू तिरी केलेल्या महाआरतीची जबाबदारी नाशिकच्या शिवसैनिकांनी लीलया पेलली असून, सिंहस्थ कुंभमेळा व गोदावरीच्या महाआरतीचा पूर्वानुभव नाशिकच्या शिवसैनिकांना असल्यामुळेच देशात गाजलेल्या शिवसेनेची ‘चलो अयोध्या’ची घोषणा यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या भेटीची महत्त्वाची जबाबदारी नाशिकचे संपर्क नेते खासदार संजय राऊत यांच्यावर टाकण्यात आली होती. राऊत यांचे नाशिकशी असलेल्या जवळच्या संबंधातूनच नाशिकच्या शिवसैनिकांना शरयू तिरी करण्यात आलेल्या महाआरतीचे यजमानपद सोपविण्यात आले होते. त्यासाठी संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, नगरसेवक सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते व विलास शिंदे या चौघांवर पक्षाने ठाकरे कुटुंबीयांच्या वतीने करण्यात येणाऱ्या महाआरतीची जबाबदारी सोपविली होती. त्यासाठी या पथकाने गेल्या महिन्यापासून चार वेळा अयोध्येचा दौरा केला. उद्धव ठाकरे यांच्या दौºयापूर्वी गेल्या चार दिवसांपासून हे पथक अयोध्येत तळ ठोकून बसले होते. दक्षिणवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाºया गोदावरी नदीवर रामकुंड येथे गोदा आरती केली जात असल्याने त्याच धर्तीवर शरयू तिरी आरती करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पक्षप्रमुखांच्या आवाहानाला प्रतिसाद देत नाशिक जिल्ह्यातून दीड हजार शिवसैनिक अयोध्येत पोहोचले असून, रविवारी ते परतीच्या प्रवासाला लागतील, अशी माहिती सुधाकर बडगुजर यांनी दिली.