नक्षली हल्ल्यात नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव शहीद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 08:09 PM2020-11-29T20:09:04+5:302020-11-29T20:13:44+5:30

छत्तीसगडमधील रायपूरमध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात सीआरपीएफचे सहायक कमांडंट नाशिकचे सुपुत्र नितीन पुरुषोत्तम भालेराव यांना वीरमरण आले. नक्षलविरोधी मोहिमेवरून परतत असताना बुर्कापाल कॅम्पच्या सहा किलोमीटर आधी नक्षलवाद्यांनी जमिनीवर पेरलेल्या भुसुरुंगाच्या स्फोटात त्यांनी प्राण गमावला. रविवारी सायंकाळी नाशिक अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवाला मानवंदना देऊन लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Nashik's son Nitin Bhalerao martyred in Naxal attack! | नक्षली हल्ल्यात नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव शहीद !

नक्षली हल्ल्यात नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव शहीद !

Next
ठळक मुद्देसीआरपीएफचे सहायक कमांडंट यांना अखेरचा निरोप पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

नाशिक : छत्तीसगडमधील रायपूरमध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात सीआरपीएफचे सहायक कमांडंट नाशिकचे सुपुत्र नितीन पुरुषोत्तम भालेराव यांना वीरमरण आले. नक्षलविरोधी मोहिमेवरून परतत असताना बुर्कापाल कॅम्पच्या सहा किलोमीटर आधी नक्षलवाद्यांनी जमिनीवर पेरलेल्या भुसुरुंगाच्या स्फोटात त्यांनी प्राण गमावला. रविवारी सायंकाळी नाशिक अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवाला मानवंदना देऊन लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

भालेराव हे मूळ निफाड तालुक्यातील देवपूरचे रहिवासी आहेत. काही वर्षांपासून ते नाशिक शहरातील राजीवनगर येथे वास्तव्यास होते. छत्तीसगडमधील सुकमा येथील ताडमेटला भागात कोब्रा बटालियन रात्रीची गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी शनिवारी (दि.२८) रात्री स्फोट घडवून आणला. या स्फोटात भालेराव यांच्यासह इतर नऊ कमांडोदेखील जखमी झाले हाेते. जखमींना हेलिकॉप्टरने रायपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्यात भालेराव हे गंभीर जखमी झाल्याने उपचाराआधीच पहाटे साडेतीन वाजता भालेराव यांची प्राणज्योत मालवली. रात्रीच्या सुमारास परतत असताना बुर्कापाल कॅम्पच्या सहा किलोमीटर आधी माओवाद्यांच्या ॲम्बुशमध्ये जवान अडकले. त्यावेळी नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला. पिपल गुरील्ला आर्मीचे नक्षलविरोधी अभियान दोन डिसेंबरपासून सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर माअेावाद्यांनी हल्ला घडवून आणल्याची माहिती समोर येत आहे. २००८ मध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दलात (सीआरपीएफ) दाखल झालेले भालेराव हे २०१० पासून कोब्रा बटालियनमध्ये सहायक कमांडंट पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, कन्या, दोन भाऊ, वहिनी असा परिवार आहे. भालेराव यांचे पार्थिव रायपूरहून विमानाने ओझर विमानतळावर आल्यानंतर त्यांच्या राजीवनगरच्या ‘श्रीजी सृष्टी’ या निवासस्थानी आणण्यात आले. शोताकूल कुटुंबीय आणि उपस्थित जनतेने अंत्यदर्शन घेतल्यावर फुलांनी सजवलेल्या रथातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. नाशिक अमरधाममध्ये त्यांच्या बंधूच्या हस्ते पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान नितीन भालेराव यांना श्रद्धाजंली अर्पण करण्यासाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठा तथा पालकमंत्री छगन भुजबळ, नाशिक परिक्षेत्राचे विशेेेेष पोलीस महानिरीक्षक डाॅ. प्रतापराव दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपायुक्त अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्यासह सीआरपीएफचे अधिकारी उपस्थित होते.

‘नितीन भालेराव अमर रहे’

भालेराव यांचे पार्थिव घेऊन येणारे वाहन त्यांच्या घराजवळ उभे राहताच उपस्थित नागरिकांनी ‘भारत माता की जय’ ‘नितीन भालेराव अमर रहे’ ‘जब तक सूरज चांद रहेगा, नितीन तेरा नाम रहेगा’ ‘वंदे मातरम’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. कुटुंबीय आणि नागरिकांचे अंत्यदर्शन झाल्यानंतर पुन्हा जोरदार घोषणा देत नितीन यांना मानवंदना दिली.

 

Web Title: Nashik's son Nitin Bhalerao martyred in Naxal attack!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.