‘भिलार’ला पोहोचली नाशिकची बोलकी पुस्तके
By admin | Published: May 8, 2017 03:42 PM2017-05-08T15:42:10+5:302017-05-08T15:42:10+5:30
पुस्तकांच्या गावाला भेट : नॅब मोडक सेंटर-कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून नवी ओळख बनलेल्या सातारा जिल्ह्यातील भिलार या गावात सुरू झालेल्या उपक्रमात सारस्वतांचे गाव असलेल्या नाशिकनेही खारीचा वाटा उचलला असून, दोनशे बोलक्या पुस्तकांचा संच ‘भिलार’च्या वाचकांना उपलब्ध झाला आहे. त्यासाठी नॅब डॉ. मोडक रिसर्च अॅण्ड रिहॅबिटिलेशन सेंटर आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. ज्या वाचकांची दृष्टी अधू झालेली आहे, वयोमानानुसार वाचन करणे अवघड बनले आहे किंवा ज्यांनी शाळेत जाऊन कधीही मुळाक्षरे गिरविली नाहीत अशा अनपढ वाचकांसाठी ही बोलकी पुस्तके उपयुक्त ठरणार आहेत.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक रानडे यांच्या संकल्पनेतून ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रम राबविला जात आहे आणि या उपक्रमाने देशाच्या सीमाही ओलांडल्या आहेत. पुस्तकांच्या गावाला पुस्तके तर लाखोने जातील, परंतु वाचनचळवळ सर्व घटकांपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि नॅब डॉ. मोडक रिसर्च अॅण्ड रिहॅबिटिलेशन सेंटर यांनी अंध मुलांसाठी तयार केलेली बोलकी पुस्तके भिलारला पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, राज्य मराठी संस्थेच्याच सहाय्याने दोनशे बोलक्या पुस्तकांचा संच भिलारला पाठविण्यात आला आहे. त्यामध्ये ७५ मराठी व इतर हिंदी-इंग्रजी भाषेतील आहेत. भिलार गावातील अनेक ज्येष्ठ, वयोवृद्धांना पुस्तकांचे वाचन करणे शारीरिकदृष्ट्या शक्य होत नाही किंवा ज्यांनी कधीही शाळा शिकलेली नाही अशा लोकांना ही बोलकी पुस्तके शांतपणे बसून ऐकता येणार आहेत. आॅडिओ सीडीजच्या स्वरूपात तयार केलेली ही पुस्तके गावातील अंध वाचकांनाही उपयुक्त ठरणार आहेत. या बोलक्या पुस्तकांमध्ये पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रजांपासून अनेक नामवंत लेखकांच्या साहित्याचा समावेश आहे. त्यात भविष्यात आणखी भर घातली जाणार आहे.