नाशिककरांचे ‘थ्री डी वॉकेथॉन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 01:21 AM2019-09-16T01:21:40+5:302019-09-16T01:23:15+5:30
ख्यातनाम विचारवंत दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मधुमेह मुक्ती आणि वेटलॉस मोहीम चालविणाऱ्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ‘थ्री डी वॉकेथॉन’च्या माध्यमातून रविवारी (दि.१५) सकाळी ७ ते १० वाजेदरम्यान हजारो नाशिककरांनी रस्त्यावर उतरून पाच किलोमीटर चालण्याचा व्यायाम केला.
नाशिक : ख्यातनाम विचारवंत दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मधुमेह मुक्ती आणि वेटलॉस मोहीम चालविणाऱ्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ‘थ्री डी वॉकेथॉन’च्या माध्यमातून रविवारी (दि.१५) सकाळी ७ ते १० वाजेदरम्यान हजारो नाशिककरांनी रस्त्यावर उतरून पाच किलोमीटर चालण्याचा व्यायाम केला. असोसिएशन आॅफ डायबेटिस अॅण्ड आॅबेसिटी रिव्हर्सल (अॅडोर)तर्फे लठ्ठपणा व मधुमेह मुक्तीचा संदेश विश्वभरात पोहोचविण्यासाठी या ‘थ्री डी वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते.
लठ्ठपणा आणि मधुमेहाने ग्रासलेल्या रुग्णांसाठी दररोज चालणे हा उत्तम व्यायाम असून, शरीर निरोगी राहण्यास त्याची मदत होते. तसेच विविध आजारांपासूनही मुक्ती मिळते, त्यासाठी ‘लठ्ठपणा व मधुमेह मुक्त विश्व’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करीत डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्यासह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. अजित कुमठेकर, डॉ. नितीन घैसास, डॉ. अजित मराठे आयमाचे अध्यक्ष डॉ. प्रशात देवरे यांच्या हस्ते यांनी रविवार (दि. १५) इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथून वॉकेथानला झेंडा दाखवून सुरुवात झाली. पुढे साईनाथनगर चौफुली, बापू बंगला, सावरकर चौक, राजे छत्रपती चौक, सार्थकनगर बस थांबामार्गे गुरुगोविंद सिंग महाविद्यालयापर्यंत हजारो नाशिककरांनी पायी चालण्याचा व्यायाम करीत वॉकेथॉनमध्ये सहभाग नोंदविला. जगभरात वीस देशांमधील १९४ शहरांमध्ये वॉकेथॉनच्या माध्यामातून सुमारे ५० हजारांहून अधिक नागरिकांनी सुदृढ आरोग्यासाठी सहभाग नोंदविल्याचे त्यांनी सांगितले. भारतात नाशिकसह दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, गोवा, बेळगाव, औरंगाबाद, गडचिरोली, फलटण, कराडसह नांदुरा यांसारख्या गाव खेड्यांच्या ठिकाणीही हजारो नागरिकांनी वॉकेथॉनमध्ये चालण्याचा व्यायाम केल्याचे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, या वॉकेथॉनमध्ये सहभागी होणाºया सर्वांनीच आपले आयुष्य निरोगी आणि सुदृढ राखण्यासाठी दोन वेळा जेवण आणि ४५ मिनिटांत साडेचार किलोमीटर चालण्याचा व्यायाम ही आपली जीवनशैली बनविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी रत्ना अष्टेकर, अनिरुद्ध अथनी, डॉ, श्याम अष्टेकर, अॅडोर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त संदीप सोनवणे, संजय बरसे आदी उपस्थित होते.
सहभागी नागरिकांना प्रमाणपत्र
थ्री डी वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या सर्व नागरिकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या प्रमाणपत्रावर मागच्या बाजूला ‘लठ्ठपणा आणि मधुमेहमुक्ती’ मोहिमेत सहभागी होण्याची प्रक्रिया विशद करण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांनी आपला लठ्ठपणा कमी करण्यासाठी, मधुमेह मुक्तीसाठी ‘लठ्ठपणा आणि मधुमेहमुक्त विश्व’ मोहिमेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उद्देश असल्याचे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी सांगितले. लठ्ठपणा आणि मुधमेहाने ग्रासलेल्या रुग्णांसाठी दररोज चालणे हा उत्तम व्यायाम असून, शरीर निरोगी राहण्यास त्याची मदत होते. तसेच विविध आजारांपासूनही मुक्ती मिळते, त्यासाठी ‘लठ्ठपणा व मधुमेह मुक्त विश्व’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी यावेळी केले.