नाशिकच्या भाजीपाल्याचे ट्रक गुजरात सीमेवर अडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 11:07 PM2021-04-17T23:07:38+5:302021-04-18T00:05:23+5:30
पंचवटी : नाशिक जिल्ह्यातून शनिवारी (दि.१७) सायंकाळी द्राक्ष, तसेच भाजीपाला घेऊन जाणारे मालट्रक सापुतारा चेक नाक्यावर गुजरात राज्यातील पोलिसांनी अडवले असून, त्यामुळे याठिकाणी रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्रात कोरोना वाढल्याने गुजरातमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल नसल्याच्या कारणावरून हे ट्रक गेल्या दोन ते तीन तासांपासून अडवण्यात आले आहेत. शंभराहून अधिक मालवाहू वाहने संबंधित चेक नाक्यावर थांबून असल्याने वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या आहेत.

कोरोना चाचणी आरटीपीसीआर अहवाल आणा मगच वाहने सोडू, अशी भूमिका गुजरात पोलिसांनी घेतल्याने गुजरात राज्याकडे शेतमाल, तसेच द्राक्षमाल घेऊन जाणाऱ्या शेकडो वाहनचालकांची मोठी अडचण झाली होती. सध्या संपूर्ण देशभर कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने शासनस्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. राज्यभरात पंधरा दिवस कडक निर्बंध लागू केले असून, यामध्ये मालवाहतूकीला सूट देण्यात आली आहे. शनिवारी (दि.१७) सापुतारा चेक नाक्यावर नाशिक जिल्ह्यातील वणी दिंडोरी- ओझर- पिंपळगाव बसवंत भागातून द्राक्ष व भाजीपाला घेऊन जाणारी वाहने दोन तासांपासून अडवून ठेवल्याने वाहनचालकांची कोंडी झाली आहे. सापुतारा चेक नाक्यावर गुजरात राज्यात द्राक्ष व भाजीपाला घेऊन जाणारी वाहने अडविल्यानंतर दिंडोरी तालुक्यातील काही नागरिकांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याशी संपर्क साधून वाहने अडविली याबाबत तक्रार केली. त्यानंतर झिरवाळ यांनी जिल्हा प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधत चेक नाक्यावर थांबविलेल्या गाड्या गुजरातकडे रवाना करण्याच्या बाबतीत तोडगा काढण्याबाबत सूचना केल्या.