ड्रग्जमाफिया ललितला भल्या पहाटे मुंबई पोलिसांनी घडविली नाशिकची 'व्हीसीट'!
By अझहर शेख | Published: October 22, 2023 01:50 PM2023-10-22T13:50:10+5:302023-10-22T13:52:23+5:30
ललित पाटील हा मूळ नाशिकचा आहे. नाशिकमध्ये त्याने ड्रग्जची फॅक्टरी शिंदे गावात चालविली होती ही फॅक्टरी सकिनाका पोलिसांनी पंधरवड्यापूर्वी उद्धवस्त केली.
नाशिक : ड्रग्जमाफिया संशयित ललित पाटील (पानपाटील) ला अटक केल्यानंतर मुंबई पोलीस रविवारी पहाटे त्याला एका खासगी कारमधून नाशिकमध्ये घेऊन दाखल झाले होते. ललित सध्या पोलीस कोठडीत आहे.
ललित पाटील हा मूळ नाशिकचा आहे. नाशिकमध्ये त्याने ड्रग्जची फॅक्टरी शिंदे गावात चालविली होती ही फॅक्टरी सकिनाका पोलिसांनी पंधरवड्यापूर्वी उद्धवस्त केली. पुणे पोलिसांच्या तावडीतून ससून रुग्णालयात उपचार घेताना ललित 2 ऑक्टोबर ला निसटला होता. त्यानंतर तो थेट नाशिकला आला. येथील त्याच्या दोन निकटवर्तीय महिलांना भेटला संशयित अर्चना निकमच्या पंचवटी येथील फ्लॅटमध्ये वास्तव्य केले. 25 लाखांची रोकड तिच्याकडून घेतल्यानंतर ललित या आर्थिक 'रसद'च्या जोरावर नाशकातून पळून गेला. यानंतर नाशिक पोलिसांनी संशयित निकम या महिलेला ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केली. तिच्याकडून ललित चा भाऊ भूषण याने दिलेली 7किलो चांदी नाशिक पोलिसांनी हस्तगत केली.
यानंतर निकम हिला पोलिसांनी पुणे पोलिसांच्या हवाली केले. ललित ला पळवून लावण्यासाठी मदत केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी निकम व तिची साथीदार प्रज्ञा कांबळे या दोघींना अटक केली आहे. एकूणच या एमडी ड्रग्ज प्रकरणाला सध्या नाशिक, मुंबई व पुणे अशा तीनही शहराच्या पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी तपासाला गती देण्यासाठी ललितला घेऊन नाशिकच्याशिंदे गावात रविवारी सकाळीच दाखल झाले. त्याने त्याचा भाऊ ड्रग्जचा मास्टरमाइंड भूषण पाटील च्या मदतीने उभारलेल्या एमडीड्रग्ज च्या फॅक्टरी वर पोलीस घेऊन गेले. सुमारे तीन तास पोलीस ललित ला घेऊन नाशिकमध्ये तपास करत होते. याबाबत पोलिसांनी कमालीची गोपनीयता पाळली मात्र ते नाशिकमधून परतताना माध्यमांनी त्यांच्या कारला कॅमेऱ्यात टिपले. ललीतची ही नाशिक व्हीसीट 'मीडिया लीक' होऊ नये यासाठी मुबंई पोलिसांनी कमालीची खबरदारी घेत गोपनीयता पाळली होती.