नाशिकची पाणथळे विदेशी पक्ष्यांसाठी उत्तम ‘डेस्टिनेशन’

By अझहर शेख | Published: February 4, 2021 10:02 PM2021-02-04T22:02:44+5:302021-02-04T22:32:56+5:30

गंगापुर धरणासह आजुबाजुची या समुहातील अन्य लहान-मध्यम स्वरुपातील धरणांचेही तितकेच महत्व आहे. गंगापुर धरणालगत साकारण्यात आलेल्या बोट क्लबद्वारे पक्षीजीवनाविषयी लोकांना जागरुक करता येणे सहज शक्य आहे. पर्यटनाला बुस्ट देण्याच्या हेतुने बोटीद्वारे पक्षी निरिक्षणाचीही संधी उपलब्ध करुन देण्याचा विचार एमटीडीसीने करायला हरकत नाही.

Nashik's wetlands are a great 'destination' for migratory birds | नाशिकची पाणथळे विदेशी पक्ष्यांसाठी उत्तम ‘डेस्टिनेशन’

नाशिकची पाणथळे विदेशी पक्ष्यांसाठी उत्तम ‘डेस्टिनेशन’

Next
ठळक मुद्देनिसर्ग आणि जैवविविधता अधिकाधिक समृध्दस्थलांतरीत विदेशी पक्ष्यांना उत्तम अशी 'कनेक्टीविटी' पाणथळांचे किनारे अधिक सुरक्षित करण्याची गरज

गोदावरी, दारणा, कादवा, कोळवण यांसारख्या प्रमुख नद्या नाशिकमधून वाहतात. नाशिकमध्ये गंगापुर, दारणा, वाघाड, ओझरखेड, करंजवण, काश्यपी आदी धरणे आहेत. येथुन पुढील मुंबई असो किंवा बारामतीजवळील उजनी धरणाचे बॅकवॉटरपर्यंत पोहचण्याकरिता नाशिक 'डेस्टिनेशन'कडून स्थलांतरील पाहुण्यांना मोठी ऊर्जा मिळते. नाशिकमधील पाणथळे आणि येथील पक्षीजीवन याविषयी 'नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी नाशिक'च्या पक्षी अभ्यासक प्रतीक्षा कोठुळे यांच्याशी साधलेला हा संवाद...
----
१) नाशिकच्या पाणथळ भेटीदरम्यान आपल्याला काय आढळून आले?
- नाशिकच्या बाबतीत हे आवर्जुन म्हणावे लागेल, की येथील निसर्ग आणि जैवविविधता अधिकाधिक समृध्द आहे. सोसायटीच्या वतीने आयोजित पाच दिवसीय सर्वेक्षणात पाणथळांना भेटी दिल्या. नांदुरमधमेश्वर हे तर जलचर परिसंस्थेला अधिक मजबुत करणारे अफलातून पाणथळ असून हे केवळ नाशिकचेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे वैभव आहे. जागतिक स्तरावरील 'रामसर' साईट म्हणून नावलौकिक मिळविलेले महाराष्ट्रातील नांदुरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य पहिले ठिकाण आहे. ज्याअर्थी या पाणथळाच्या संवर्धनासाठी 'रामसर'चा दर्जा मिळतो, त्याअर्थी या ठिकाणाचे जैवविविधतेच्या दृष्टीने महत्व अधोरेखित होते. नाशिकच्या धरणांमध्ये बारामाही जलसाठा टिकून असतो. गंगापूर, काश्यपी, गौतमी-गोदावरी, आळंदी तसेच वाघाड धरण स्थलांतरीत विदेशी पक्ष्यांना उत्तम अशी 'कनेक्टीविटी' प्रदान करतात.


२) नाशकातील पाणथळ स्थळे महत्त्वाची का वाटतात?
-नाशिकमधील गंगापुर धरणांसारखी अन्य सर्व पाणथळे विदेशी पक्ष्यांच्या मध्य आशियाई उड्डाणमार्गातील अतीमहत्वाचे विश्रांती थांबे आहेत.
हजारोे किलोमीटरचा प्रवास करत युरोप, सायबेरीया आदि विदेशांमधून येणारे स्थलांतरीत पक्षी या धरणांवर विसावतात. या धरणांमध्ये बारामाही जलसाठा असतो. तसेच हिवाळा संपल्यानंतर जेव्हा विदेशी पाहुणे परतीचा प्रवास सुरु करतात तेव्हा मध्य आशियाई मार्गावरुन परतताना पुन्हा नाशिकची पाणथळे महत्वाची भुमिका बजावतात. या पाणथळांमुळे स्थलांतरीत पक्ष्यांचा प्रवास अधिकच सुखकर होतो. त्यामुळे येथील पाणथळांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.
३) पाणथळांसभोवतालचे पक्षीजीवन आणि धोके याविषयी काय सांगाल?
-पाणथळांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. गंगापुर धरणाचे खोलीकरण करताना सावरगाव, गोवर्धन, दुगाव शिवारात असे आढळून आले की किनाऱ्यापासून खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे पक्ष्यांचे खाद्य आणि एकाप्रकारचा त्यांचा अधिवास धोक्यात सापडला आहे. पाणथळांचे किनारे अधिकअधिक सुरक्षित करण्याची गरज आहे. धरणांमधील गाळाचा उपसा करताना किंवा खोलीकरण करताना खोदकाम जलाशयामध्ये झाले पाहिजे; मात्र तसे होताना दिसत नाही. गंगापुर धरणासह आजुबाजुची या समुहातील अन्य लहान-मध्यम स्वरुपातील धरणांचेही तितकेच महत्व आहे. गंगापुर धरणालगत साकारण्यात आलेल्या बोट क्लबद्वारे पक्षीजीवनाविषयी लोकांना जागरुक करता येणे सहज शक्य आहे. पर्यटनाला बुस्ट देण्याच्या हेतुने बोटीद्वारे पक्षी निरिक्षणाचीही संधी उपलब्ध करुन देण्याचा विचार एमटीडीसीने करायला हरकत नाही.

४) लोकांचा हस्तक्षेप कसा धोक्याचा वाटतो?
- गंगापुर धरणाच्या परिसरात लोकांचा हस्तक्षेप नाही असे म्हणता येणार नाही. सावरगाव, गोवर्धन, दुगाव या भागात गंगापुर धरणाच्या परिसरात बहुतांश लोक कावळ्यांना शेव, चिवडा, पापडी, वेफर्स अशाप्रकारचे मानवी खाद्य खाण्यास देतात, ते अत्यंत चुकीचे आहे. हे खाद्य त्यांच्यासाठी घातकच आहे. कावळ्यांना खाण्यासाठी मानवी खाद्य जेव्हा देतात तेव्हा त्यांना तयार अन्न मिळते आणि कावळ्यांची संख्या वाढण्यास पोषक ठरते. कावळ्यांची वाढती संख्या अन्य देशी-विदेशी स्थलांतरीत पक्ष्यांसाठी धोकेदायक ठरु शकते. कावळ्याकडून पक्ष्यांची शिकारही केली जाते. कावळा अन्य पक्ष्यांची पिल्ले, अंडी यांचेही नुकसान करत असतो, त्यामुळे पर्यावरणात व पाणथळांभोवती कावळ्यांची संख्या नियंत्रणात राहणे अत्यंत गरजेचे आहे.

५) नाशिकममध्ये आपल्याला एकुण किती व कोणत्या प्रजातीचे पक्षी आढळून आले.
- नाशिकमध्ये नांदुरमधमेश्वर वगळून गंगापुर, काश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी, वैतरणा, वाघाड या धरणांवर भेटी दिल्या असता सुमारे ५० ते ६० पक्ष्यांच्या प्रजाती बघावयास मिळाल्या. यामध्ये पाणपक्षी, गवताळप्रदेशातील पक्षी मोठ्या संख्येने पहावयास मिळाले. कॉमन पोचार्ड (छोटी लालसरी), थापट्या, प्लवा, तरंग, तलवार बदक, गडवाल, चक्रांग, चक्रवाक ही बदके मोठ्या संख्येने पहावयास मिळाली. या सर्वेक्षणाचे मुख्य वैशिष्ट म्हणजे वाघाड धरणाच्या जलाशयावर प्रथमच श्याम कादंब (ग्रे लॅग गुज) या पक्ष्याच्या जोडीने दर्शन दिले. या सर्व धरणांवर मिळून सुमारे पाच ते साडेपाच हजार पक्षी गणणेनेत आढळून आले. यावरुन नाशिकचे पक्षीजीवन किती समृध्द आहे, याचा सहज अंदाज बांधता येतो.--

- शब्दांकन : अझहर शेख

 

Web Title: Nashik's wetlands are a great 'destination' for migratory birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.