‘संदर्भ’मध्ये अद्ययावत शिशुकक्षाचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 10:40 PM2017-09-10T22:40:06+5:302017-09-10T22:52:16+5:30
नाशिकमध्ये लेव्हल थ्रीचा अद्ययावत एसएनसीयू कक्षाबाबत चर्चा व परिस्थितीची विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी रविवारी (दि़१०) पाहणी केली़ त्यानुसार विभागीय संदर्भमध्ये स्वतंत्र कक्ष उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसोबत सोमवारी (दि़११) होणाºया बैठकीत मांडणार असल्याचे झगडे यांनी सांगितले़
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागात बाहेरून उपचारासाठी दाखल केली जाणारी कमी वजनाच्या बाळांची मोठी संख्या, द्वितीय श्रेणीमध्ये मोडत असल्याने पीडिअॅट्रिक व्हेंटिलेटर सुविधेचा अभाव व त्यामुळे वाढणारे बालमृत्यू ही परिस्थिती सुधारण्यासाठी नाशिकमध्ये लेव्हल थ्रीचा अद्ययावत एसएनसीयू कक्षाबाबत चर्चा व परिस्थितीची विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी रविवारी (दि़१०) पाहणी केली़ त्यानुसार विभागीय संदर्भमध्ये स्वतंत्र कक्ष उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसोबत सोमवारी (दि़११) होणाºया बैठकीत मांडणार असल्याचे झगडे यांनी सांगितले़
विभागीय आयुक्त झगडे यांनी सायंकाळी जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागास भेट देऊन लेव्हल थ्रीच्या स्वतंत्र एसएनसीयू कक्षाबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेमध्ये नाशिक जिल्हा रुग्णालय हे लेव्हल टूचे रुग्णालय असल्याने या ठिकाणी ते शक्य नाही, तर नाशिक महापालिकेला वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने यापूर्वीच परवानगी नाकारण्यात आली आहे़ यामुळे केवळ सुपरस्पेशालिटी संदर्भ रुग्णालयाचा एकमेव पर्याय आहे़
जिल्हा रुग्णालयातील बालमृत्यू प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत सोमवारी (दि़११) होणाºया नियमित बैठकीत विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्याकडून संदर्भच्या पर्यायाबाबत प्रस्ताव दाखल केला जाण्याची शक्यता आहे़ झगडे यांनी जिल्हा रुग्णालयातील कक्षास भेट दिल्यानंतर मोठ्या संख्येने दाखल होणारी कमी वजनाची अर्भके व मर्यादित इन्क्युबेटर या परिस्थितीची कल्पना त्यांना देण्यात आली़
जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात कमी वयात होणारे विवाह, कुपोषण व पोषक आहाराचा अभाव यामुळे गर्भाची वाढ होत नाही़ परिणामी कमी दिवसांची, वजनाची व कुपोषित अर्भके जन्मास येण्याचे प्रमाण अधिक आहे़ त्यातच खासगी रुग्णालयांमध्ये अशा मुलांवर उपचार करण्याची परिस्थिती नसल्याने अशी मुले जिल्हा रुग्णालयात पाठविली जातात़ इन्क्युबेटरमध्ये बालकाला ठेवण्यास प्रतिदिन मोठा खर्च येतो. हा खर्च करण्याची क्षमता गरीब लोकांमध्ये नसल्याने त्यांचा जिल्हा रुग्णालयाकडे ओढा असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले़
दरम्यान, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय हे सुपरस्पेशालिटी असल्याने या ठिकाणी लेव्हल तीनचा एसएनसीयू कक्ष उभारला जाऊ शकतो़ त्यानुसार प्रस्ताव तयार करण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावास मान्यता दिल्यास संदर्भमध्ये पीडिअॅट्रिक व्हेंटिलेटर असलेला एसएनसीयू विभाग उपलब्ध होणार आहे़