आशियाई स्पर्धेत संजीवनीची उद्या पाच हजार मीटर शर्यत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 03:54 PM2018-08-27T15:54:53+5:302018-08-27T15:58:32+5:30
नाशिक : १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत अपयश आले असले तरी ५ हजार मीटरमध्ये चांगली कामगिरी करण्याचा निर्धार आहे. कोणतेही प्लॅनिग करण्यापेक्षा चांगली कामगिरी करण्यावरच आपले लक्ष असल्याचे धावपटू संजीवनी जाधव हिने ‘लोकमत’ शी बोलतांना सांगितले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत १० हजार मीटर शर्यतीत अपयशी ठरलेल्या नाशिकच्या संजीवनी जाधव हिच्याशी संपर्क साधला असता तीने मागचे विसरून पुढच्या स्पर्धेवर लक्ष केंद्रीत केले असल्याचे सांगितले. १० हजार मीटर स्पर्धेत अपेक्षित कामगिरी होऊ शकली नाही. परंतु खेळात असे चढ उतार येत असतात. मागच्या कामगिरीकडे लक्ष देण्यापेक्षा पुढच्या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी सराव सुरू असल्याचे तीने सांगितले.
आशियाई क्रीडा स्पर्धा ही मोठी स्पर्धा आहे. कोणत्याही खेळाडूसाठी ही स्पर्धा महत्वाची असते. मला १० हजार मीटर मध्ये अपेक्षित यश गाठता आले नसले तरी चांगला अनुभव नक्कीच मिळाला आहे. या अनुभवाच्या जोरावर पुढच्या स्पर्धेत उतरणार आहे. यावेळी चांगली कामगिरी करण्यचा पक्का निर्धार असल्याचे संजीवनीने ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.
संजीवनी मंगळवार दि. २८ रोजी पुन्हा एकदा धावणार आहे. यावेळी ती ५ हजार मीटर मध्ये आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी सज्ज झाली आहे. नाशिकमध्ये सायंकाळी ६.२० वाजता दुरचित्रवाणीवर जकार्ता येथून थेट प्रेक्षेपण पाहायला मिळणार आहे.