सरपंच, ग्रामसेवकांविरुद्ध आचारसंहितेचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 04:38 PM2019-03-28T16:38:04+5:302019-03-28T16:38:58+5:30
नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाच चांदवड तालुक्यातील साळसाणे ग्रामपंचायतीने विकासकामांसाठी निविदा प्रकाशित करून संबंधित कामासाठी साहित्यांचीदेखील खरेदी ...
नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाच चांदवड तालुक्यातील साळसाणे ग्रामपंचायतीने विकासकामांसाठी निविदा प्रकाशित करून संबंधित कामासाठी साहित्यांचीदेखील खरेदी केल्याने या प्रकरणी संबंधित सरपंच आणि ग्रामसेवकांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चांदवड तालुक्यातील साळसाणे येथील मदन शिंदे यांनी या पक्र रणी सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी चांदवड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले होते. चांदवड गटविकास अधिकाºयांनी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन चौकशी केली असता सरपंच व ग्रामसेवक यांनी १५ मार्च रोजी निविदा प्रसिद्ध करून निविदा मागविल्या होत्या. २० मार्चपर्यंत सहा निविदा प्राप्त झाल्या. २३ मार्च रोजी एक निविदा स्वीकारण्यात आल्याचे आढळून आले.
निवडणूक आयोगाने रीतसर जारी केलेल्या आदेशाचा अवमान झाल्याने गटविकास अधिकाºयांनी चांदवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, ग्रामसेवकांनी व ग्रामपंचायतींनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून मतदारांना प्रभावित करण्याची कोणतीही कृती करू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले आहे.