अनुसूचित जमातीच्या बालकांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 03:07 PM2018-02-08T15:07:32+5:302018-02-08T15:13:29+5:30
आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक प्रकल्पातंर्गत पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, निफाड,इगतपुरी आणि सिन्नर या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या बालकांना इयत्ता पहिली आणि दुसरीच्या इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
आदिवासी विभाग : सोमवारपासून होणार अर्ज उपलब्ध
नाशिक : आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक प्रकल्पातंर्गत पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, निफाड,इगतपुरी आणि सिन्नर या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या बालकांना इयत्ता पहिली आणि दुसरीच्या इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार असून दि. १२ पासून आदिवासी विकास भवन येथे प्रवेश अर्ज उपलब्ध होणार आहे. संबंधितांना बालकाचा जन्म दाखला आणि आधारकार्डाची साक्षांकीतप्रत सादर करावी लागणार आहे.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिकवर्ष २०१८-१९साठी इयत्ता पहिली आणि दुसरीच्या इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्याचे पालक हा दारिद्रय रेषेखालील असेल तर त्यासंबंधीत यादीतील अनुक्रमांक नमूद करणे अपेक्षित आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न कमाल एक लाख इतके अपेक्षित आहे. पहिलीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या बालकाचे वय ३० सप्टेबर २०१८ रोजी ५ वर्ष ८ महिने पुर्ण असावा त्याचा जन्म १ जानेवारी २०१२ ते ३० जानेवारी २०१३ दरम्यान झालेला असावा.
इयत्ता दुसरीच्या वर्गात प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्याला मागीलवर्षीच्या पहिलीच्या वर्गाचे बोनाफाईड प्रमाणपत्र अपेक्षित आहे. शिवाय विद्यार्थ्याचे आधारकार्ड तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र देखील अपेक्षित आहे. विद्यार्थ्याचे पालक शासकीय, निमशासकीय सेवेत नसावेत असे कळविण्यात आले आहे. अर्ज दि. १२ फेब्रुवारी ते १० मार्च पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,आदिवासी विकास भवन येथे उपलब्ध होणार आहे. तर २० मार्च पर्यत अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आलेली आहे.
प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी होऊन विद्यार्थ्यांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. दि. २८ एप्रिल रोजी पेठ, इगतपुरी, सिन्नर आणि नाशिक तालुक्यातील पालकांनी आणि २९ एप्रिल रोजी त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, येवला, निफाड तालुक्यातील पालकांनी एकलव्य पब्लिक स्कुल, पेठरोड (आरटीओ आॅफीस जवळ) नाशिक येथे सकाळी १० वाजता उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
लकी ड्रॉ पद्धतीने सोडत
मंजूर लक्षांका पेक्षा अर्ज जास्त प्राप्त झाल्यास विद्यार्थ्यांची निवड ही लकी ड्रॉ पद्धतीने करण्यात येणार आहे. दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता अर्जांची संख्या मोठी असल्याने सोडतीद्वारे विद्यार्थ्यांची नावे निश्चित केली जातात. अशावेळी पालकांनी सामंजस्याची भूमिका घेऊन आदिवासी विकास विभागास सहकार्य करावे असे देखील आवाहन करण्यात आले आहे.