अखेरच्या दिवशी आठवले शाळेचे दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 08:46 PM2018-03-22T20:46:21+5:302018-03-22T20:46:21+5:30
गेल्या १ मार्चपासून सुरू झालेली इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवार, दि. २३ रोजी संपल्याने विद्यार्थ्यांनी ऐकमेकांची गळाभेट घेत आनंद व्यक्त केला. शालेय जीवनातील अखेरचा दिवस विद्यार्थी आणि पालकांनाही आठवला आणि सारेच शाळेच्या जुन्या आठवणीत रमले. कुठे गुरूजन आपल्या विद्यार्थ्यांना भेटायला परीक्षा केंद्रांवर आले होते, तर काही विद्यार्थिनींचे डोळे पाणावल्याचे चित्र परीक्षा केंद्रांवर दिसत होते.
नाशिक : गेल्या १ मार्चपासून सुरू झालेली इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवार, दि. २३ रोजी संपल्याने विद्यार्थ्यांनी ऐकमेकांची गळाभेट घेत आनंद व्यक्त केला. शालेय जीवनातील अखेरचा दिवस विद्यार्थी आणि पालकांनाही आठवला आणि सारेच शाळेच्या जुन्या आठवणीत रमले. कुठे गुरूजन आपल्या विद्यार्थ्यांना भेटायला परीक्षा केंद्रांवर आले होते, तर काही विद्यार्थिनींचे डोळे पाणावल्याचे चित्र परीक्षा केंद्रांवर दिसत होते.
विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाला कलाटणी देणारी दहावीची परीक्षा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठीही तितकीच महत्त्वाची असते. गुरुवारी दहावीचा अखेरचा पेपर संपला आणि विद्यार्थ्यांनी एकमेकांना निकालासाठी आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. एकीकडे दहावीची परीक्षा सुरळीत पार पडल्याचा आनंद असताना दुसरीकडे शालेय आयुष्याचा उंबरठा ओलांडल्याचे दु:खदेखील व्यक्त करण्यात आले. विशेषत: पालक अधिक भावुक झाले होते. डोळ्यासमोर पहिलीत घातलेली मुले आज दहावीची परीक्षा देऊन बाहेर पडल्याने त्यांच्यासमोर आपल्या पाल्याचा शालेय जीवनातील पटच उभा राहिला.
शहरातील अनेक परीक्षा केंद्रांवर शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आले होते. परीक्षा संपून विद्यार्थी बाहेर येताच विद्यार्थी शिक्षकांपुढे झुकले आणि चरणस्पर्श करीत त्यांचा निरोप घेतला. या भावुकप्रसंगी अनेक शिक्षिकांचे डोळेदेखील पाणावले, तर शाळेतील अनेक मैत्रिणींनी साश्रू नयनांनी एकमेकींना निरोप दिला. निरोपाचा हा भावनिक खेळ एकीकडे सुरू असताना जवळच्याच स्नॅक्स, ज्युस दुकानांसमोर छोटेखानी पार्टी करून काहींनी आनंदोत्सवदेखील साजरा केला.
परीक्षा केंद्रातून विद्यार्थी बाहेर आल्यानंतर शाळेच्या आवारातच परीक्षेचा अखेरच्या दिवशी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आनंद व्यक्त करीत एकमेकांचे अभिनंदन केले. पालकही मोठ्या संख्येने परीक्षा केंद्राबाहेर उभे होते. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचीही इतर पालकांबरोबर यापुढे भेट होणार की नाही म्हणून तेही एकमेकांना पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत हस्तांदोलन करीत गळाभेट घेत होते. शाळेच्या आवारात अशाप्रकारचा स्नेहसोहळा अनेक ठिकाणी दिसून आला. परीक्षेनंतरही बराच वेळ गर्दी असल्याने काही शाळांना ध्वनिक्षेपकावर शाळेचे आवार सोडण्याचे आवाहन करावे लागले.
--कोट--
शाळेला आणि गणवेशालाही अलविदा
गेल्या दहा वर्षांपासून आम्ही शाळेचा गणवेश परिधान करीत होतो. आज या गणवेशाचादेखील अखेरचा दिवस आहे. शाळा सुटली, गणवेशही सुटला, उद्यापासून शाळेचा गणवेश परिधान करता येणार नाही. परंतु शाळेची आठवण म्हणून गणवेश जपून ठेवणार आहे.
- साक्षी सोनवणे, विद्यार्थिनी